टीआरपी घोटाळा : ‘रिपब्लिक’साठी पैसे पुरविणाऱ्याला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:26 AM2020-10-18T10:26:38+5:302020-10-18T10:29:30+5:30
वादग्रस्त रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन स्थानिक चॅनेल्सनी जाहिराती मिळविण्यासाठी टीआरपी रॅकेटमधून कोट्यवधीचा महसूल जमविल्याचे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले. रिपब्लिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संपादक अर्णब गोस्वामी व इतरांची या प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. (Republic TV)
मुंबई : रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी पैसे पुरविणाऱ्या उमेश मिश्राला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तो ‘हंसा’चा माजी कर्मचारी असून त्याला शुक्रवारी मुंबई गुन्हे गुप्त वार्ता विभागाने (सीआययू) विरार येथून अटक केली होती. वादग्रस्त रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन स्थानिक चॅनेल्सनी जाहिराती मिळविण्यासाठी टीआरपी रॅकेटमधून कोट्यवधीचा महसूल जमविल्याचे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले. रिपब्लिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संपादक अर्णब गोस्वामी व इतरांची या प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (२१), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (४४), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (४७), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (४४) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठीला अटक करण्यात आली आहे. मिश्रा याच्या अटकेनंतर पोलिसांकडून आता दिनेश विश्वकर्मा, रॉकी व अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.