लग्नाच्याच दिवशी वधूला गाठावे लागले पोलीस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:11 AM2018-03-08T05:11:43+5:302018-03-08T05:11:43+5:30
७० हजार हुंडा द्या नाहीतर लग्न मोडेल, अशी धमकी दिली. वडीलांनी जावयासह सासू सास-यांचे पाय धरले. लगेच पैसे कुठून आणायचे. थोडा वेळ द्या.. अशी विनवणी केली. नव-याच्या आईने मुलीच्या आईच्या कानशिलात लावली आणि तेथून निघून गेले. मात्र मांडवात रडण्यापेक्षा वधूने थेट...
- मनीषा म्हात्रे
मुंबई - साखरपुड्यानंतर लग्नाची तारिख ठरली. मांडव सजला. वडिलांनी कर्ज काढून दागिने, घरातील सर्व वस्तू भेटीत दिल्या. मंगळसूत्र घालण्यापूर्वी सासूने हॉलसह, दिलेल्या भेट वस्तूंना नावे ठेवण्यास सुरुवात केली. ७० हजार हुंडा द्या नाहीतर लग्न मोडेल, अशी धमकी दिली. वडीलांनी जावयासह सासू सास-यांचे पाय धरले. लगेच पैसे कुठून आणायचे. थोडा वेळ द्या.. अशी विनवणी केली. नव-याच्या आईने मुलीच्या आईच्या कानशिलात लावली आणि तेथून निघून गेले. मात्र मांडवात रडण्यापेक्षा वधूने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.’ याप्रकरणी मालाड पोलिसांनी नव-यासह त्याच्या वडीलांना बेड्या ठोकल्या आहेत. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला अशी घटना घडणे खेदजनक आहे.
जोगेश्वरीत १९ वर्षीय नेहा (नावात बदल) आई, वडील आणि भावासोबत राहते. वडीलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय.नेहासाठी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कळव्यातील आशिष गुप्ताचे (२२) स्थळ आले. १४ नोव्हेंबरला पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगा उच्चशिक्षित असल्याने १९ जानेवारीला साखरपुडा पार पडला. तेव्हा सर्व खर्च नेहाच्या वडीलांनीच केला. ५ मार्च रोजी लग्नाची तारिख ठरली. ठरल्याप्रमाणे वधूकडच्यांनी मानपान, नातेवाईकाचा पाहुणचार करायचा, लग्नाचा हाँल व जेवणाचा खर्चही करायचा असे ठरले नेहाच्या वडीलांनी होकार दिला.
मालाड पश्चिमेकडील कोळी समाज हॉल बुक केला. मुलीसाठी दागिने तसेच घरच्या सर्व वस्तू भेट म्हणून दिल्या. ५ मार्चला सहा वाजता लग्नाचे विधी सुरू झाले. त्यातच अंतिम टप्प्यात ८ च्या सुमारास नव-या मुलाची आई शिवकुमारी हिने हॉलला नावे ठेवत वधूला दिलेल्या वस्तू फेकण्यास सुरुवात केली.
’हमने लडकियो को बहुत दहेज दिया है, आप लोगो को भी हमें दहेज देना पडेगा’ म्हणत ७० हजाराचा हुंडा द्या, नाहीतर लग्न होणार नाही, अशी धमकी दिली. नेहाच्या वडीलांनी त्यांचे पाय धरले. आधीच मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले. त्यात आणखीन पैसे कसे उभे करायचे. थोडा वेळ द्या..जावयाचेही पाय धरले. मात्र त्यानेही नकार दिला. पैसे देत नाही म्हणून नवरोबानेही मंगळसूत्र घालण्यास नकार दिला. पाय धरुन विनंती करत असताना नवºयाच्या आईने नेहाच्या आईच्या कानशिलात लगावली. आणि नव-यानेही त्यांना धक्काबुकी केली. आणि तिघेही निघून गेले.
रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरु होता. अखेर मध्यरात्री दोनच्या सुमारास नेहाने वडीलांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी नवरा आणि त्याच्या आई वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर महाडीक यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नवरा आणि त्याच्या वडीलांना हुंड्याच्या गुन्ह्यांत अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे महाडीक यांनी सांगितले.