महामार्गाच्या सुरक्षेला पोलिसांची नकारघंटा !
By admin | Published: June 24, 2014 12:58 AM2014-06-24T00:58:41+5:302014-06-24T00:58:41+5:30
महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गृहविभागाने महामार्ग पोलीस दल तैनात केले आहे. मात्र या दलाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष होते आहे. विभागातील कर्मचारी
अधिकाऱ्यांचा तुटवडा : गृहविभागाचे दुर्लक्ष
नागपूर : महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गृहविभागाने महामार्ग पोलीस दल तैनात केले आहे. मात्र या दलाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष होते आहे. विभागातील कर्मचारी कार्य करण्यास अनिच्छुक आहे. वाहतुकीच्या तुलनेत पोलीस दलाची यंत्रणा कमकुवत आहे. नागपूर आणि अमरावती विभाग मिळून एक पोलीस अधीक्षक, दोन उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षकांची मंजुरी आहे. मात्र विदर्भात महामार्ग पोलिसांक डे अधीक्षक आणि उपअधीक्षकही नाही. पीआयकडे प्रभारी डीवायएसपीची जबाबदारी आहे.
नागपूर विभागात नऊ पोलीस चौकी आहे. प्रत्येक पोलीस चौकीकडे २०० किलोमीटर क्षेत्राची जबाबदारी आहे. प्रत्येक चौकीत एक एपीआय, तीन पीएसआय व अन्य पोलीस शिपाई अशा २० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या प्रत्येक चौकीत ५० टक्केही कर्मचारी नाही. प्रत्येक चौकीकडे फक्त एकच वाहन आहे. अपघातग्रस्तांना मदत करणे, वाहतूक जाम झाल्यास सुरळीत करणे, वाहनात बिघाड असल्यास चालान करणे, या जबाबदाऱ्या पोलिसांना पार पाडाव्या लागतात.
नियमांकडे दुर्लक्ष
औद्योगीकरणामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या वाहतुकीबरोबरच महामार्गावर सुधारणाही करण्यात आल्या आहे. दुपदरी असलेले महामार्ग सहा पदरी झाले आहे. वाहतूक सुरळीत होईल, अपघात कमी होती, अशी अपेक्षा होती. मात्र वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली. नागपुरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ कोलकाता - मुंबई आणि महामार्ग क्रमांक ७ जबलपूर - हैद्राबाद जातो. विदर्भातील कोळशाच्या खाणी, औद्योगीकरण, प्रवासी वाहतूक आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशच्या सीमा जवळ असल्याने, जड वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. (प्रतिनिधी)