पोलीस बंदोबस्तात पुणे, मुंबईकडे दूध रवाना
By admin | Published: June 2, 2017 01:18 AM2017-06-02T01:18:50+5:302017-06-02T01:18:50+5:30
शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात बाहेरून येणाऱ्या शेतमालामध्ये घट झाली. स्थानिक भाजीपाला जरी उपलब्ध झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात बाहेरून येणाऱ्या शेतमालामध्ये घट झाली. स्थानिक भाजीपाला जरी उपलब्ध झाला असला तरी या संपाची तीव्रता एक-दोन दिवसांत जाणवण्याची शक्यता आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या संघाचे दूध संकलन बंद केले आहे; तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्तात गोकूळ आणि वारणा दूध संघांचे ४० दूध टॅँकर पुण्या-मुंबईकडे रवाना झाले आहेत.
शेतकरी संपाची उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोल्हापुरात कमी तीव्रता आहे. हा संप मोडून काढण्याचा प्रयत्न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये सकाळी साडेअकरापर्यंत भाजीपाल्याचे सौदे संपले होते. त्यानंतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाराच्या सुमारास या ठिकाणी आले. या वेळी त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. टोमॅटोच्या काही गोण्याही रस्त्यावर फेकल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळ आणि वारणा दुधाचे पुणे आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर वितरण होते. त्यामुळे ‘गोकूळ’चे २५ टॅँकर आणि वारणा दुधाचे १५ टॅँकर दिवसभरामध्ये पोलीस बंदोबस्तात पुण्या-मुंबईकडे रवाना करण्यात आले.
सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुधाचे टॅँकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले, तर काही ठिकाणी वाहनांचे टायर फोडण्यात आले. ग्रामीण भागातून शेतकरी कृषिमाल घेऊन साताऱ्यात आले नाहीत. त्यामुळे दुपारपर्यंत मंडई ओस पडली होती.