विसर्जनाच्या वेळी पोलिसांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2016 05:29 AM2016-09-13T05:29:14+5:302016-09-13T05:29:14+5:30
कल्याणमध्ये गणेश विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच, गणेश विसर्जन स्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात
मुंबई : कल्याणमध्ये गणेश विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच, गणेश विसर्जन स्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात महिला पोलीस शिपाई दहिबावकर गंभीर जखमी झाल्या. बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या गणेश विसर्जन तलावाच्या ठिकाणी महिला पोलीस शिपाई दहिबावकर या त्यांच्या सहकाऱ्यांसह कर्तव्य बजावत होत्या. गणेश विसर्जन करण्यासाठी पोलीस घाई करत असल्याच्या रागातून, रात्री दहाच्या सुमारास तीन तरुणांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
दगडफेकीमध्ये दहिबावकर यांच्यासह चंद्रकांत सुतार हे गणेशभक्त गंभीर जखमी झाले. दगडफेक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी या ठिकाणी अतिरिक्त कुमक पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दहिबावकर आणि सुतार यांच्यावर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कस्तुरबा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून, २६ वर्षीय संदेश सुतार याला अटक केली आहे. दगडफेकीमध्ये सामील असलेल्या अन्य दोन तरुणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.