पोलीस, चालकांत धुमश्चक्री
By admin | Published: January 19, 2015 04:33 AM2015-01-19T04:33:48+5:302015-01-19T04:33:48+5:30
कलमार आॅपरेटर्सच्या संपामुळे आधीच बेजार झालेल्या कंटेनर चालकांचा रविवारी पोलिसांशी वाद झाला. याचे रूपांतर धुमश्चक्रीत झाले
उरण : कलमार आॅपरेटर्सच्या संपामुळे आधीच बेजार झालेल्या कंटेनर चालकांचा रविवारी पोलिसांशी वाद झाला. याचे रूपांतर धुमश्चक्रीत झाले. पोलिसांचा लाठीमार आणि चालकांच्या दगडफेकीमुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. वाहनचालकांनी पोलिसांची जीप उलटूवन तिला आग लावली.
इतक्यावरच न थांबता वाहनचालकांनी मदतीला येणाऱ्या पोलिसांना रोखण्यासाठी पोर्ट युजर्स इमारतीच्या चौकाजवळ टायर, लाकडे टाकून अडथळा निर्माण केला. तासभर चाललेल्या गंभीर प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या एसीपीच्या हाताला दुखापत झाली. पोलिसांनी काही वाहनचालकांना ताब्यात घेतले आहे.
वातावरण गंभीर असतानाच पोलीस आणि वाहन चालकांत शाब्दिक बाचाबाची झाली. यात पोलिसांच्या मारहाणीने भर पडली. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या संतप्त वाहनचालकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. उभी असलेली जीप वाहनचालकांनी उलटून पेटवून दिली. पोलिसांनी जादा कुमक मागवली. मात्र त्यांच्या वाटेतही वाहनचालकांनी अडथळा निर्माण केला. जादा पोलीस कुमक पोहोचताच वाहनचालकांनी पोबारा केला. पोलिसांनी काही वाहनचालकांना ताब्यात घेतले.
वाहनचालकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी हुज्जत आणि कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला होता. वाहनचालकांच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. वाहनाला आग लावली. दगडफेकीत पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झाल्याची माहिती एसीपी शशिकांत बोराटे यांनी दिली.
पोलिसांनी आधी वाहनचालकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे संतप्त चालकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी आणि काही शिपिंग कंपनीच्या एजंटांनी दिली. पोलीस आणि वाहनचालकांमधील तासाभराच्या धुमचक्रीमुळे वातावरण चिघळले आहे. सध्या पोलिसांनी घटनस्थळी पोलीस बंदोबस्तात वाढ केल्याने परिसरात शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (वार्ताहर)