‘क्राइम पॉकेट्स’वर पोलिसांचा ‘डोळा’
By admin | Published: March 14, 2016 01:14 AM2016-03-14T01:14:52+5:302016-03-14T01:14:52+5:30
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जमिनींचे चढते भाव, बांधकाम व्यवसायात रुजलेली मनगटशाही, त्यातून पोसली जाणारी संघटित गुन्हेगारी आणि खंडणीसत्र यासोबतच ‘भाईगिरी’ मोडीत काढण्यासाठी
लक्ष्मण मोरे पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जमिनींचे चढते भाव, बांधकाम व्यवसायात रुजलेली मनगटशाही, त्यातून पोसली जाणारी संघटित गुन्हेगारी आणि खंडणीसत्र यासोबतच ‘भाईगिरी’ मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांनी दोन्ही शहरांमधील ‘क्राइम पॉकेट्स’ निश्चित केले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आयुक्तालय स्तरावर अभ्यास करून पोलिसांनी गुन्हेगारीची आश्रयस्थाने असलेल्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. या भागांतील सराईत गुन्हेगार, खंडणीखोर, चोरटे आणि स्वयंघोषित भाई यांची जंत्रीच तयार करण्यात आली असून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.भविष्यातील गुन्हेगारीचे आणि गुन्ह्यांचे प्रकारही बदलत्या काळानुसार बदलत जाणार, हे सूत्र लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या घटकांवरच आघात करायचे ठरवले आहे. पोलिसांच्या रडारवरील या भागांमध्ये गुन्हेगारी कशी निर्माण होते, गुन्हेगारीला खतपाणी घालणारे घटक कोणते आहेत, गुन्हेगारी कारवायांमध्ये कोणकोणते गुन्हेगार सहभागी असतात, त्यांचे ‘रेकॉर्ड’ काय आहे, यासोबतच त्यांचा आश्रयदाता कोण आहे, या सर्व मुद्यांचा अभ्यास करून त्यावरील उपायांचा पोलिसांनी आराखडाच तयार केला आहे.गेल्या दहा-बारा वर्षांत शहराच्या व्याप्तीबरोबर गुन्हेगारीचा आणि बेकायदेशीर धंद्यांचा आलेख वाढता राहिलेला आहे. एकेकाळी गुन्हेगारांना चळाचळा कापायला लावणाऱ्या पुणे शहर पोलीस दलाचा दरारा कमी झाल्याची टीका मध्यंतरीच्या काळात नागरिकांमधून केली जाऊ लागली होती. बेडकीच्या पोटाप्रमाणे पुणे शहर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहर आणि शहरालगतच्या भागामध्ये बेसुमार बांधकामे उभी राहत आहेत. आपापल्या भागात वर्चस्वासाठी लढणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून बांधकाम व्यावसायिक आणि लँडमाफियांनी पुण्यामध्ये टोळीयुद्धाला खतपाणी घातले.
‘खादी’च्या मागे लपून आपल्या टोळ्या शहरभर फोफावणाऱ्या गुन्हेगारांना कसे रोखणार, हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय झालर पांघरून काही टोळीप्रमुखांनी आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवलेल्या आहेत. पोलीस ठाणे स्तरावर पोलीस निरीक्षकांनी खमकी आणि ठोस भूमिका न घेतल्यामुळे शहरात टोळीयुद्धाचा मध्यंतरी भडका उडाला होता. शहरातील खंडणी, अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, सोनसाखळीचोऱ्या यांसोबतच जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले. यासोबतच महिलांविषयक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत गेले. या सर्व मुद्यांसह गुन्हेगारी टोळ्या आणि गुन्हेगारांची संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी ठोस पावले उचलण्याचे धोरण अवलंबले आहे.
मात्र, गेल्या सहा-सात महिन्यांत पुणे पोलिसांनी तब्बल १४ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई करीत गुंडांना येरवडा कारागृहामध्ये धाडले आहे. तसेच, अनेकांवर एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाईदेखील केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणलेलेच आहे. सध्या शहरात २२ पेक्षा अधिक गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी एमपीडीए आणि मोक्काचा पोलिसांनी शस्त्र प्रभावी म्हणून वापर केला आहे.
गोळीपेक्षा गुन्हेगाराला कायद्यानेही बेजार करता येते, हेसुद्धा पोलिसांनी दाखवून दिले आहे.
यासोबतच सराईत चोरट्यांचे अड्डे, सोनसाखळी चोरट्यांची ऊठबस करण्याची ठिकाणेही पोलिसांनी निष्पन्न केली आहेत.
शहराच्या उपनगरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे
सुरू आहेत. या बांधकाम व्यावसायिकांना मिळणाऱ्या धमक्या, व्यापाऱ्यांकडून उकळली जाणारी लाखो रुपयांची खंडणी, अपहरण रोखण्यासाठी पोलीस विशेष प्रयत्न करणार आहेत.
त्यामुळे या बदलांना सामोरे जाताना गुन्हे अन्वेषण आणि गुन्हेगारी रोखणे या दोन मुद्यांवर पोलिसांच्या प्रशिक्षण व्यवस्थेतही बदल घडविण्याची तयारी ठेवली आहे. दूरगामी विचार करून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलिसांनी विचारपूर्वक आखलेला ‘प्लॅन’ सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल, अशी अपेक्षा आहे.