बड्या व्यापा-यांवर पोलिसांची नजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:30 AM2017-07-26T05:30:54+5:302017-07-26T05:30:57+5:30
नोटाबंदीच्या काळात अनेक व्यापाºयांनी जुन्या नोटा बदलविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. काही व्यापाºयांमार्फत नक्षलवाद्यांनी आपल्याकडील जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या
आलापल्ली (गडचिरोली) : नोटाबंदीच्या काळात अनेक व्यापाºयांनी जुन्या नोटा बदलविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. काही व्यापाºयांमार्फत नक्षलवाद्यांनी आपल्याकडील जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या. यातूनच सोमवारी आलापल्ली येथील धान्य व्यापारी परशुराम डोंगरे याला सव्वा कोटीच्या संशयास्पद व्यवहारप्रकरणी अटक झाल्यानंतर पोलिसांच्या नजरा अजून काही व्यापाºयांवर खिळल्या आहेत.
नोटाबंदीपूर्वीच्या काळात आलापल्ली परिसरातील बरेचशे व्यापारी बँकांमार्फत आर्थिक व्यवहार करीत नव्हते; मात्र नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर व्यापाºयांना बँकेत धाव घ्यावी लागली. यादरम्यान नक्षलवाद्यांचा काळा पैसा पांढरा करण्याच्या हेतूने स्वत:च्या बँक खात्यात पैसे जमा करणाºया अहेरी उपविभागातील बड्या व्यापाºयांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे बडे व्यापारी धास्तावले आहेत. सोमवारी अटक केलेल्या परशुराम डोंगरेचे बँक आॅफ महाराष्टÑमधील खाते पोलिसांनी काही महिन्यांपूर्वीच गोठविले होते, अशी माहिती पुढे आली आहे.
डोंगरे हा अंकित ट्रेडर्स या नावाने धान्याचा व्यापार करीत असला तरी आलापल्ली वनविभागांतर्गत पेरमिली वन परिक्षेत्रातील मेडपल्ली व बुर्गी येथील दोन तेंदू युनिटही त्याने खरेदी केले होते. तसेच भामरागड वन विभागांतर्गत ताडगाव वन परिक्षेत्रातील बोटनफुंडी येथील एक तेंदू युनिट खरेदी केला होता. दरम्यान, त्याचे बँक खाते गोठविण्यात आल्याने येथील तेंदूपत्ता मजुरांना तेंदू संकलनाची रक्कम (मजुरी) अद्यापही प्राप्त झालेली नाही, अशी माहिती उजेडात आली आहे. यामुळे मजुरी कधी मिळणार? या चिंतेत मजूर सापडले आहेत.
नोटाबंदीनंतरच्या काळातील बँकांमधल्या आर्थिक व्यवहारांवर आयकर विभागासोबत पोलिसांचीही करडी नजर होती. काही व्यापाºयांच्या बँक खात्यावर अतिरिक्त रक्कम आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली असून, बडे व्यापारीही अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.