कालव्यातून पाणी घेतलं म्हणून पोलिसांची शेतक-यांना मारहाण
By admin | Published: March 25, 2017 06:35 PM2017-03-25T18:35:19+5:302017-03-25T18:35:19+5:30
अहमदनगर येथील पाथरवाला नेवासामध्ये शेतक-यांनी मुळा कालव्याचे पाणी शेतात घेतले म्हणून पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर (भेंडा), दि. 25 - मुंबईतील मंत्रालय परिसरात पोलिसांकडून शेतकऱ्याला करण्यात आलेले मारहाण प्रकरण चर्चेत असतानाच. पाथरवाला नेवासा येथील शेतकऱ्यांनी मुळा कालव्याचे पाणी शेतात घेतले. म्हणून पोलिसांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
शेतीसाठी मुळा पाटबंधारेचे आर्वतन सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला. पाथरवाला येथील स्वामी समर्थ पाणी वापर संस्थेने, शंभर एकर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी नोंदवली होती. संस्थेकडे थकबाकी नसल्याची माहिती दत्तात्रय खाटीक यांनी दिली. पाणी वापर संस्थेच्या पाच सभासदांचे भरणे राहिले होते. त्यासाठी हे भरणे होईपर्यंत पाणी चालू ठेवावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी शेतीसाठी घेतले. म्हणून पोलिसांनी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष हरीभाऊ खाटीक, शेतकरी संतोष खाटीक यांना बेदम मारहाण केली.
मुळा पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या, पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी पाथरवाला ग्रामस्थ, पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुकाणा पोलीस चौकीसमोर आंदोलन केले. नेवाशाचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारुन असून संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्यानंतर शेतक-यांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला.