अटकेसाठी पोलिसांची फिल्डिंग
By admin | Published: October 30, 2015 12:57 AM2015-10-30T00:57:35+5:302015-10-30T00:57:35+5:30
सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चारही नगरसेवकांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी गुरुवारी ठाणे व मुंबई उच्च न्यायालयात सुरू होती
जितेंद्र कालेकर, ठाणे
सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चारही नगरसेवकांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी गुरुवारी
ठाणे व मुंबई उच्च न्यायालयात सुरू होती. ती सुरू असताना एकीकडे स्थानिक पोलीस आणि गुन्हे
अन्वेषण विभागाच्या पथकांनी त्या भूमिगत नगरसेवकांच्या घरांबाहेर फिल्डिंग लावली होती. पोलिसांचा लवाजमा घराबाहेर असल्याची खबर मिळाल्याने हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि नजीब मुल्ला यांच्यापैकी कोणीही घराकडे फिरकले नव्हते.
ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांच्या यशोधननगर येथील ‘तमन्ना’ गृहनिर्माण सोसायटीमधील नवव्या मजल्यावरील निवासस्थानी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.जी. गावित, निरीक्षक एम.एन. सातदिवे तसेच पाच महिला आणि १५ कर्मचाऱ्यांच्या पथकाने दिवसभर तळ ठोकला होता. सायंकाळी ४.३०पर्यंत त्यांच्या कार्यालयाला आणि घराला कुलूप होते. अखेर, ५ वा. जगदाळे यांचे खासगी सचिव बाविस्कर तिथे दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. ते मुंबईत आहेत, इतकीच माहिती बाविस्कर यांच्याकडून पोलिसांना मिळाली. सायंकाळी ६च्या सुमारास जगदाळे यांचा मुलगा आल्यावर पोलिसांनी घरात प्रवेश केला.
घरातील कागदपत्रे आणि इतर सामग्रीचा काही अधिकाऱ्यांसमक्ष पंचनामा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही सर्व कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांच्या राबोडीतील ‘मुल्ला हाउस’ येथील कार्यालय आणि निवासस्थानीही चौकशी केली. तिथेही काही कागदपत्रांचे पंचनामे केले. त्याच काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठामपाचे माजी गटनेते सुधाकर चव्हाण यांच्या शिवाईनगर येथील ‘मंत्राजली’ तसेच काँग्रेसचे माजी गटनेते विक्रांत चव्हाण यांच्याही मानपाडा येथे हॅपी व्हॅली येथील निवासस्थानी कासारवडवली आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक धडकले. तेथेही कुणी न आढळल्याने काही कागदपत्रांचा पंचनामा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीबीआय चौकशी व्हावी
ठाणे : परमार यांच्याकडून ज्यांनी लाच अथवा ज्यांनी खंडणी मागितली असेल त्यांची चौकशी करावी. तसेच दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. परंतु, इतर नगरसेवकांना या चौकशीत कशाला अडकवता, असा सवाल काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी केला.
ठाणे पालिकेच्या काँग्रेस कार्यालयात आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी जाहीर केलेल्या सुसाइड नोटवर त्यांनी आक्षेप नोंदवून ती नोट संपूर्ण जाहीर करावी, अशी मागणीही केली आहे. परमार यांची सुसाइड नोट आधी का लपविण्यात आली, त्यातील सगळी नावे पोलिसांनी का जाहीर केली नाहीत, त्यांची आत्महत्या झाली त्या वेळेस कोण साक्षीदार होते? चार दिवस उशिराने गुन्हा का दाखल झाला, सुसाइड नोटचा पूर्ण खुलासा पोलीस केव्हा करणार? अशा एकूण ३२ प्रश्नांची उत्तरे आपण मुख्यमंत्र्यांकडे मागितली असल्याचे ते म्हणाले. तसेच सध्या सुरू असलेला तपास हा संशयास्पद असल्याचेही संजय घाडीगावकर यांनी सांगितले.