भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरुद्ध अखेर कंत्राटदाराने पोलिसात दाखल केली तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 09:51 PM2017-09-09T21:51:55+5:302017-09-09T22:19:45+5:30
भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरोधात कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी अखेर शनिवारी सायंकाळी येथील वडगाव रोड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली.
यवतमाळ, दि. 9 - आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरोधात कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी अखेर शनिवारी सायंकाळी येथील वडगाव रोड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. तोडसाम हे आपल्यावर पैशासाठी दबाव टाकत असून लोकसेवक असल्याने त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
शिवदत्त शर्मा यांच्यासह कंत्राटदारांच्या एका शिष्टमंडळाने ठाणेदार बाळासाहेब खाडे यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी अमित उत्तरवार, प्रशांत पोटे, राजू कोठारी, संतोष देशमुख, नीलेश भुरेवार, प्रवीण उंबरकर, शरद जुमळे, प्रसाद दुबे, राजू वैद्यवार, सुरेश अग्रवाल, संजय येरावार आदी कंत्राटदार उपस्थित होते. आमदार तोडसाम हे लोकसेवक आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १३ (२) तसेच भादंविच्या ३२३, ५०४, ५०६, ३८३, ४१७ व ५११ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तोडसामविरुद्ध तत्काळ एफआयआर नोंदविण्याची मागणी कंत्राटदारांनी केली. यावेळी पुरावा म्हणून तोडसाम यांनी शर्मा यांच्याशी केलेल्या मोबाईल संभाषणाची सीडीही पोलिसांना सादर करण्यात आली. तोडसाम यांनी ६ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी १२.४२ मिनिटांनी आपल्या मोबाईलवर संपर्क करून पैशासाठी दबाव टाकला, धमकी दिली, असे निवेदनात म्हटले आहे.