पोलिसांची २५० नवीन पदे भरणार
By admin | Published: May 5, 2015 01:29 AM2015-05-05T01:29:59+5:302015-05-05T01:29:59+5:30
वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी या प्रमाणात अपुऱ्या संख्याबळामुळे पोलिसांवर ताण वाढला आहे. झपाट्याने नागरीकरण होत असल्याने घोडबंदर
ठाणे : वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी या प्रमाणात अपुऱ्या संख्याबळामुळे पोलिसांवर ताण वाढला आहे. झपाट्याने नागरीकरण होत असल्याने घोडबंदर, कल्याण, मुंब्रा आणि भिवंडी या भागांसाठी चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव आयुक्तांमार्फत पाठविण्यात आला होता. त्यापैकी वागळे इस्टेटमधून चितळसर मानपाडा आणि कल्याण परिमंडळातून खडकपाडा या दोन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यासाठी नवीन २५० पदांनाही मंजुरी मिळाली. त्यामुळे आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या आता ३५ झाली आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांच्या कारकिर्दीत चार परिमंडळांतून प्रत्येकी एका वाढीव पोलीस ठाण्याच्या प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यापैकी वागळे इस्टेटमधील वर्तकनगर, कापूरबावडी आणि कासारवडवली या तीन पोलीस ठाण्यांमधून चितळसर मानपाड्याची तर कल्याणच्या आधारवाडी कारागृह परिसरात खडकपाडा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात आले आहे. खडकपाड्याची इमारतही तयार झाली आहे, तर चितळसर मानपाड्याला ठाणे महापालिकेने अलीकडेच जागा दिली. त्यामुळे या दोन्ही पोलीस ठाण्यांसाठी अधिसूचना काढून ती येत्या काही दिवसांत कार्यान्वित होईल. याशिवाय, भिवंडी परिमंडळातील दापोडा आणि ठाणे शहरमधील मुंब्रा पोलीस ठाण्यातून दिवा हे प्रस्ताव मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. (प्रतिनिधी)