सोलापूरातील लोकप्रतिनिधींच्या घरांसह कार्यालयांना पोलीसांचा गराडा
By admin | Published: June 7, 2017 02:36 PM2017-06-07T14:36:03+5:302017-06-07T14:36:03+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास लोकप्रतिनिधींच्या घरांवर मोर्चा काढू असा इशारा दिला होता़ याच पार्श्वभूमीवर कोणताच अनुचित प्रकार घडू नये याबाबतची काळजी घेत शहर व ग्रामीण पोलीसांनी लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर व संपर्क कार्यालयांना पोलीस छावणीचे स्वरूप देत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव व संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे़ मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत आहे़ संपाच्या सहाव्या दिवशी तहसिल कार्यालयांना टाळे ठोक आंदोलनानंतर संपाच्या सातव्या दिवशी लोकप्रतिनिधींच्या घरांवर मोर्चे काढू असा इशारा संपकरी शेतकरी संघटनांनी दिला होता़ याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीसांनी शहरात असलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोउद्योग मंत्री सुभाष देशमुख, खा़ शरद बनसोडे, आ़ प्रणिती शिंदे यांच्या घरासह संपर्क कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़ याशिवाय माजी उपमुख्यमंत्री तथा खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ हनुमंत डोळस, बार्शीचे आ़ दिलीप सोपल, करमाळा येथील आ़ नारायण पाटील, पंढरपूरचे आ़ प्रशांत परिचारक, आ़ भारत भालके, सांगोल्यातील आ़ गणपतराव देशमुख, माढाचे आ़ बबनराव शिंदे, आ़ दत्तात्रय सावंत यासह अन्य लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ग्रामीण पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़
------------------------------
सोपल यांनी स्वत: कुलुप लावुन शेतकरी संपाला दिला पाठींबा
राज्यात सुरु झालेल्य शेतकरी संप आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे़ लोकप्रतिनिधी च्या कार्यालयालया टाळे ठोकण्याचा आजचा कार्यक्रमामुळे बार्शीत आ.दिलीप सोपल यांच्याही घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ हा पोलीस बंदोबस्त पाहुन व शेतकरी संपाला पाठींबा देण्याच्या उद्देशाने आ.सोपल यांनीच स्वत: हुन आगळगाव रोड स्थीत "सोपल बंगला " या कार्यालयास टाळे लावुन आंदोलनास जाहीर पाठींबा दिला आहे. २८८ व ७८ आमदारापैकी आ.सोपल हे एकमेव स्वत: हुन कार्यालयास कुलुप ठोकुन शेतकरी संप आंदोलनास पाठींबा देणारे एकमेव आमदार ठरले आहेत.
----------------------
मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चे काढून शासनाचा निषेध व्यक्त करू इशारा दिला होता़ त्याच पार्श्वभूमीवर शहरातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर व संपर्क कार्यालयांवर कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता़
- अपर्णा गीते
पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर पोलीस दल़