पोलीस दलाचा ‘आयडॉल’ हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 05:38 AM2018-05-12T05:38:17+5:302018-05-12T05:38:17+5:30

पीळदार शरीरयष्टी कमावलेला बॉडीबिल्डर, कर्तव्यदक्ष, नेहमी हसतमुख असणारे आयपीएस हिमांशू रॉय हे पोलीस दलासह नव्याने पोलीस दलात भरती होणाऱ्यांसाठी ‘आयडॉल’ होते.

Police force 'Idol' failed | पोलीस दलाचा ‘आयडॉल’ हरपला

पोलीस दलाचा ‘आयडॉल’ हरपला

Next

मुंबई : पीळदार शरीरयष्टी कमावलेला बॉडीबिल्डर, कर्तव्यदक्ष, नेहमी हसतमुख असणारे आयपीएस हिमांशू रॉय हे पोलीस दलासह नव्याने पोलीस दलात भरती होणाऱ्यांसाठी ‘आयडॉल’ होते. त्यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मुंबईच्या फोर्टमधील एका खासगी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर, सेंट झेविअर्स कॉलेजमधून त्याने पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे सीएची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आयपीएससाठी प्रयत्न सुरू केले. ते १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी बनले.  

पोलिसांना समुपदेशनाची गरज
 मुंबई : हिमांशू रॉय यांनी शुक्रवारी दुपारी राहत्या घरात आत्महत्या केल्यानंतर, पुन्हा एकदा पोलिसांवरील ताण-तणावाचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना समुपदेशनाची अत्यंत गरज असल्याचे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. पोलिसांची हीच समुपदेशनाची गरज अधोरेखित करण्यासाठी मुंबईतील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना पत्र पाठविले होते. मात्र, याची पोलीस प्रशासनाकडून विशेष दखल घेण्यात आली नाही.
पोलिसांचा दिनक्रम, आरोग्यविषयक तक्रारी, कुटुंबाच्या अपेक्षा, वरिष्ठांचा दबाव, बढतीचा मुद्दा, रजेचा अभाव, जेवणाच्या अनिश्चित वेळा अशा एक ना अनेक कारणांमुळे पोलीस दलावर ताण-तणाव वाढत आहे. पोलीस दलातीन कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून ते थेट वरिष्ठ अधिकाºयापर्यंत सर्वच या मानसिक ताणतणावात्ोून जात असतात. त्यामुळे अशा मानसिक स्थितीत पोलीस दलाला समुपदेशनाची अत्यंत गरज आहे, असे म्हणत, डॉ. मुंदडा यांनी पाच महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले. शिवाय, या पत्राचा पाठपुरावा करीत प्रशासन विभागातील सहपोलीस आयुक्तांची भेटही घेतली, परंतु ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली नसल्याची खंत डॉ. मुंदडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
डॉ. मुंदडा यांनी सांगितले की, मुंबई शहर-उपनगरातील सर्व डिव्हिजनसाठी पोलिसांकरिता मोफत मानसिक समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र पाठविले होते, परंतु पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत आत्महत्येचे पाऊल टाळण्यासाठी कोणताही आजार झालेल्या रुग्णाचे व नातेवाइकाचे समुपदेशन झालेच पाहिजे, असे ते म्हणाले.

रॉय यांना व्यायामाची प्रचंड आवड होती. कुठेही पोस्टिंग झाली की, ते सर्वात आधी तेथील व्यायामशाळत जायचे. सोबत काम केल्याचा अभिमान रॉय यांनी पोलीस दलाच्या सेवेतच नव्हे, तर खासगी आयुष्यातही सर्वांना आधार दिला. ते अत्यंत संवेदशील होते. त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. त्यांचा मृत्यू हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. ते माझ्या खूप जवळचे होते.
- निकेत कौशिक, आयुक्त, लोहमार्ग पोलीस.

नैराश्याला तोंड देण्यासाठी ठोस यंत्रणा महत्त्वाची
कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती असली, तरीही शरीराला जसा त्रास होतो, तसा मनालाही होतो. त्यामुळे रॉय यांच्या प्रकरणात त्यांना कर्करोग होता. त्याचप्रमाणे, त्यांच्या मनावरही तितकाच ताण होता. कर्करोगावर उपचार जसे महत्त्वाचे आहेत, तसे निराश मनावरही झाले पाहिजेत. मात्र, त्याविषयी कधीच वाच्यता होत नाही, हे दुर्दैव आहे. कर्करोगाचे उपचार होताना रुग्णाला मानसिक समुपदेशनाची प्रक्रिया बंधनकारक केली पाहिजे. कारण कमी-अधिक फरकाने प्रत्येक रुग्णाला या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्याला कसे तोंड द्यावे, हे समुपदेशनातून शिकविले गेले पाहिजे.
- डॉ. राजेंद्र बर्वे,
ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ.

त्यांच्याकडूनच शिकायला मिळायचे...
हिमांशू सरांचा फिटनेसकडे जास्त कल असे. सुरुवातीला तीन ते चार वर्षे त्यांचा फिटनेस टेÑनर म्हणून मी काम पाहिले. त्यांना शिकविण्यापेक्षा त्यांच्याकडूनच जास्त शिकायला मिळत असे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसला आहे.
- राहुल पाटील, फिटनेस टेÑनर.

त्यांनी कुणालाच दुखावले नाही
हिमांशू रॉय हा जिंदादिल माणूस होता. मोठ्या पदावर असून, त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही बडेजाव नव्हता. शिपायापासून वरिष्ठ अधिकाºयांना ते अदबीने वागवायचे. ते कोणालाही कधीच ताटकळत ठेवत नसत. इतकेच नाही, तर त्यांनी कधीही कोणाला दुखावले नाही.
- उज्ज्वल निकम, ज्येष्ठ विधिज्ञ.
 


नक्षलवाद्यांचा केला बीमोड
रॉय यांनी नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड केला. परिविक्षाधिन काळात १९९२मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलात मालेगावसारख्या संवेदनशील ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक म्हणून ते रुजू झाले होते. त्यांनी १७ वर्षे नाशिकशी स्नेह कायम ठेवला होता.
त्यांनी मालेगावच्या अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात करून भल्याभल्या गुंडांना जेलमध्ये डांबले होते. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत १९९५मध्ये युती सरकारच्या काळात रॉय यांना नाशिक पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली. त्या काळी जिल्ह्यात डोके वर काढलेल्या इंधन भेसळ टोळीची पाळेमुळे खोदण्याचे अवघड काम त्यांनी हाती घेतले. मालेगावच्या सोयगाव भागात ‘सप्तशृंगी फार्म’मध्ये झालेल्या पाटील कुटुंबातील ६ जणांच्या हत्याकांडातील आरोपींचा कोणताही सुगावा मिळत नसतानाही त्याचा त्यांनी यशस्वीपणे उलगडा केला. हे हत्याकांड त्यांचाच भाऊ व पुतण्याने केले होते. चिखलात सापडलेल्या घराच्या कुलपाच्या किल्लीच्या आधारे त्यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचविले.
पेठ, सुरगाणा, हरसूल, त्र्यंबक शिवारात फोफावलेल्या पीपल्स वॉर ग्रुप या जहाल नक्षलवादी चळवळीचे मोठे आव्हान रॉय यांनी मोठ्या शिताफीने पेलले. 

 


यापूर्वीच्या घटना...
२३ मार्च २०१३ - राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी (४५) यांनी कुटुंबासमोरच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

३१ डिसेंबर २०१० - अहमदनगरच्या श्रीरामपूर रेल्वे रुळावर लोकलखाली एल.टी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बोरुडे यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर पवईतील मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.१ फेब्रुवारी २०१८ - धुळ्यामध्ये रमेशसिंग परदेशी या पोलीस अधिकाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत होते. रमेशसिंग यांच्या सेवा निवृत्तीला अवघे ४ महिने शिल्लक होते. शहरातले डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.३१ जानेवारी २०१८ - कोल्हापूरच्या निवृत्त पोलीस निरीक्षक बबन पांडुरंग बोबडे (६४) यांनी पत्नी सुरेखाचा खून करून स्वत:च्या डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना मिळालेल्या चिठठ्ठीत फ्लॅट सोडून जाण्यास घरमालकिणीने तगादा लावल्याच्या कारणातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख बोबडे यांनी केला होता.३ मे २०१५ - वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वाकोला पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप शिर्के याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गोळी झाडून स्वत:वरही गोळ्या झाडल्या. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.

Web Title: Police force 'Idol' failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.