पोलीस दल ‘व्हॉटस् अॅप’वर
By admin | Published: November 10, 2015 02:43 AM2015-11-10T02:43:06+5:302015-11-10T02:43:06+5:30
पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सुरू केलेल्या व्हॉटस् अॅपच्या सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यावर औरंगाबादकरांनी सर्वाधिक तक्रारी नोंदविल्या आहेत.
लक्ष्मण मोरे, पुणे
पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सुरू केलेल्या व्हॉटस् अॅपच्या सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यावर औरंगाबादकरांनी सर्वाधिक तक्रारी नोंदविल्या आहेत.
महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या सूचनेनुसार सर्व आयुक्तालये आणि अधीक्षक कार्यालयांमध्ये नागरिकांच्या तक्रारींसाठी व्हॉट्स अॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. दोन महिन्यांत राज्यातील ४५ आस्थापनांच्या व्हॉट्स अॅप क्रमांकांवर तब्बल २ हजार ७१८ तक्रारी आल्या. त्यात सर्वाधिक औरंगाबाद शहरातील असून, त्यानंतर मुंबई लोहमार्ग पोलीस, सोलापूर शहर, कोल्हापूर आणि सोलापूर ग्रामीणच्या तक्रारींचा समावेश आहे.
दीक्षित यांनी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस दल संदेशाच्या देवाणघेवाणीत ‘स्मार्ट’ करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात
व आयुक्त कार्यालयांच्या स्तरावर व्हॉट्स अॅप सेवा सुरू झाली आहे. पोलीस दलाच्या संकेस्थळावर हे क्रमांक दर्शनी भागात देण्यात आले आहेत.
औरंगाबादच्या नागरिकांनी पुणे, मुंबईला मागे टाकत १,६०० तक्रारी नोंदविल्या आहेत. त्या खालोखाल मुंबई रेल्वेच्या १८५, सोलापूर शहराच्या १७३, कोल्हापूरच्या १३२, तर सोलापूर ग्रामीणच्या १२० तक्रारी आहेत. काही शहरांत मात्र एकही तक्रार आलेली नाही.
लोकांशी संपर्क वाढविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे पोलीस दलाने ठरविले आहे. त्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. अडचणीच्या किंवा संकटाच्या काळात पोलिसांशी लवकर संपर्क व्हावा, हा हेतू यामागे आहे. तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाते. महिलांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे. ‘व्हॉटस् अॅप’च्या ग्रुपवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास त्याबाबतही तक्रार करता येईल. आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करू नये.
- प्रवीण दीक्षित,
पोलीस महासंचालक
संकेतस्थळे सुरू करा!
सर्व आयुक्तालये, तसेच जिल्ह्यांच्या अधीक्षक कार्यालयांना वेबसाइट
सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. संकेतस्थळे अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे. अधिकारी व पोलिसांना ई-मेलचा वापर करण्यासही प्रोत्साहित करण्यात
येत आहे.