पोलीस दल ‘स्मार्ट’ बनविणार
By admin | Published: November 30, 2015 03:04 AM2015-11-30T03:04:50+5:302015-11-30T03:04:50+5:30
पोलीस दलाचे केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही. तर, मनुष्यबळासोबतच माहिती व तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्य पोलीस दलाला ‘स्मार्ट’ बनविण्यावर भर आहे.
नागपूर : पोलीस दलाचे केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही. तर, मनुष्यबळासोबतच माहिती व तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्य पोलीस दलाला ‘स्मार्ट’ बनविण्यावर भर आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यात यश मिळेल आणि गुन्हेगारांवरही जरब बसविणे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पोलीस नियंत्रण कक्षातील अद्ययावत ‘डीसीआरएमएस डायल १००’ प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी सकाळी केले. यानिमित्त नियंत्रण कक्ष परिसरात आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके, आ. प्रकाश गजभिये, आ. सुधाकर देशमुख मंचावर उपस्थित होते.
ही अत्याधुनिक यंत्रणा नागपूर पोलिसांनी सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.
डीसीआरएमएस डायल १००, सीसीटीव्ही प्रणालीमुळे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचतील. गुन्हेगारांना जेरबंद करून ते गुन्ह्याचा तातडीने उलगडा करू शकतील
आणि कोर्टात गुन्हेगारांविरुद्ध ठोस पुरावे सादर करून दोष सिद्धतेचे प्रमाण वाढवता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
२००८च्या मुंबई हल्ल्यानंतर सीसीटीव्ही नेटवर्क लावण्याबाबत तत्कालीन सरकारने निर्णय घेतला. मात्र, त्याची पूर्तता करण्यात कमालीची दिरंगाई झाली.
आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या चार महिन्यांत आम्ही वर्कआॅर्डर दिली आणि सीसीटीव्ही नेटवर्कचा पहिला फेज (१२०० कॅमेऱ्यांचा) पूर्ण झाला. त्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी होणार आहे.
सीसीटीव्ही नेटवर्कचा उर्वरित टप्पा आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)