सांगलीतील ‘ते’ पोलीस लवकरच बडतर्फ
By admin | Published: April 21, 2017 03:09 AM2017-04-21T03:09:50+5:302017-04-21T03:09:50+5:30
सांगली पोलिसांनी ९ कोटी १८ लाख रुपये हडप केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने पोलिसांच्या प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
जमीर काझी, मुंबई
सांगली पोलिसांनी ९ कोटी १८ लाख रुपये हडप केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने पोलिसांच्या प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलीस ठाणे, शाखेचे प्रभारी निरीक्षक व त्याचे सहकारी व पोलीस ठाण्यातील कारभारावर बारीक लक्ष ठेवा, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस दलातील सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत.
सांगलीतील भ्रष्टाचारप्रकरणी अटक केलेल्या ७ पोलिसांची विभागीय चौकशी तातडीने सुरू करण्याची सूचना कोल्हापूर परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना गुरुवारी दिली. त्यामुळे सध्या निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांवर लवकरच खात्यातून बडतर्फीचा बडगा उगारला जाणार आहे.
निरीक्षक विश्वनाथ धनवट, साहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, साहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील व कुलदीप कांबळे अशी या पोलिसांची नावे आहेत. याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने सुरू केला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे उघडकीस येणारे राज्य पोलीस दलातील हे पहिलेच प्रकरण आहे. त्यामुळे महासंचालकांनी अशा घटनांबाबत योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्त, अधीक्षकांना केल्या आहेत. अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी घटकप्रमुखांना याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी, साहाय्यक आयुक्तांनी कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यातील कामाची नियमित व सखोलपणे तपासणी करावी, पोलीस ठाण्याकडे दाखल गुन्हे, तक्रार अर्जाचा तपास, प्रलंबित प्रकरणाबाबत संबंधितअधिकाऱ्यांकडून अहवाल घेण्याची सूचना केली आहे. उपायुक्त, पोलीसप्रमुखांनी त्याबाबत साहाय्यक आयुक्त, उपअधीक्षकांना मार्गदर्शन करण्याचेही म्हटले आहे. सांगली प्रकरणातील पोलिसांची चौकशी तातडीने सुरू करून योग्य कारवाईचे आदेश त्यांनी कोल्हापूरचे आयजी नांगरे-पाटील यांना दिले आहेत.
अशी हडप केली कोट्यवधींची माया
१ कोल्हापूर येथील वारणानगर शिक्षक कॉलनीत छापा टाकून सांगली गुन्हा अन्वेषण पथकातील निरीक्षकांसह सात जणांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात तब्बल ९ कोटी १८ लाख रुपये हडप केले. मिरजेतील मैनुद्दीन मुल्ला याच्या घरी ३ कोटींची रक्कम मिळाल्यानंतर तपासाच्या नावाखाली त्यांनी ही रक्कम हडप करून स्वत:च्या व नातेवाइकाच्या नावे बॅँकेत जमा केली होती.
२याबाबत स्थानिक उद्योजक झुंजार सरनोबत यांनी तक्रार दिल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत निरीक्षक विश्वनाथ धनवटसह सर्व जण दोषी आढळले. सर्वांवर अपहार, कर्तव्याचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून सर्वांना निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) देण्यात आलेला आहे.