देशभरातील पोलीस दल सक्षम करणार : जी. किशन रेड्डी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 08:01 PM2019-12-08T20:01:45+5:302019-12-08T20:20:23+5:30
टीव्ही, चित्रपटातून पोलिसांची चुकीची प्रतिमा सादर केली जाते़....
पुणे : देशातील सर्व राज्यातील पोलीस दलांचे सक्षमीकरण करणार केंद्र सरकार लक्ष देत आहे़. त्यासाठी केंद्र सरकार आवश्यक तो निधी कमी पडू देणार नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी़ किशन रेड्डी यांनी रविवारी सांगितले़. त्यांनी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रातील पोलीस हुतात्मा स्मारकाला रेड्डी व केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी भेट दिली व हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण केली़. रेड्डी यांनी सांगितले की, दिल्लीत नॅशनल पोलीस मेमोरियल सेंटर उभारले आहे़ देशभरातील ३४६ जिल्हा मुख्यालयांपैकी ३०० जिल्हा मुख्यालयात पोलीस हुतात्मा स्मारक उभारले आहे़. टीव्ही, चित्रपटातून पोलिसांची चुकीची प्रतिमा सादर केली जाते़. ते बदलण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे़. पोलीस सण, समांरभा आपल्या कुटुंबासमवेत साजरे करु शकत नाही़. आपले आपल्या सरंक्षणासाठी ते त्याग करतात़ त्यांची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे़. एखाद्याने चुकीची गोष्ट केली म्हणजे सर्व पोलिसांना बदनाम करता कामा नये़. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रशिक्षणावर सरकारने भर दिला आहे़. राज्य सरकारांना फॉरेन्सिक लॅब, आधुनिकीकरणासाठी निधी दिला जात आहे़. जेव्हा केव्हा कोणावर संकट येते, तेव्हा सरकारचा माणुस म्हणून पोलीस सर्वप्रथम पोहचतात़ पोलिसांच्या कामाला सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजे़.
़़
पोलीस परिषद सफल
पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित केलेल्या तीन दिवसीय वार्षिक राष्ट्रीय पोलीस महासंचालक परिषदेसाठी ते पुण्यात आले होते़. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी या परिषदेचा समारोप झाला़. तीन दिवसांची ही परिषद सफल झाल्याचे जी़ किशन रेड्डी यांनी सांगितले़. मात्र, परिषदेबाबत अधिक काही सांगण्यास त्यांनी नकार दिला़.