पोलिसांकडूनच अश्लील शेरेबाजी

By admin | Published: December 15, 2014 04:08 AM2014-12-15T04:08:08+5:302014-12-15T04:08:08+5:30

अत्यंत हीन व खालच्या स्तरावर केलेल्या या शेरेबाजीच्या संभाषणाची आॅडिओ रेकॉर्डिंग क्लीप व्हॉटस् अपवरुन व्हायरल झाल्याने संबंधित महिला पूर्णपणे हादरुन गेली

Police foxes pornography | पोलिसांकडूनच अश्लील शेरेबाजी

पोलिसांकडूनच अश्लील शेरेबाजी

Next

जमीर काझी, मुंबई
पोलीस खात्यातील बेशिस्त खपवून न घेण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असताना एका पोलीस महिला अधिकाऱ्याबद्दल काही अधिकाऱ्यांनीच केलेले अश्लील वक्तव्य मुंबई पोलीस वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. वरिष्ठ निरीक्षक दर्जाच्या पदावर कार्यरत असलेल्या या महिलेबाबत अत्यंत हीन व खालच्या स्तरावर केलेल्या या शेरेबाजीच्या संभाषणाची आॅडिओ रेकॉर्डिंग क्लीप व्हॉटस् अपवरुन व्हायरल झाल्याने संबंधित महिला पूर्णपणे हादरुन गेली आहे. आपली प्रतिमा मलीन केल्याने आत्महत्या करण्याचा इशारा या महिल्या अधिकाऱ्याने दिला आहे. बदनामी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या महिलेने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे केली आहे.
संबंधित महिला अधिकारी व त्यांच्याबद्दल वक्तव्य करणारे दोघेही निरीक्षक दर्जाचे आहेत. महिला ही त्यांच्या पेक्षा ‘सीनियर’असून काही महिन्यांपूर्वी दोघे एकाच ठिकाणी नेमणुकीला होते. मात्र तेव्हापासून त्यांच्यात विस्तव जात नव्हता. सहा महिन्यांपूर्वी महिला अधिकाऱ्याची त्या शाखेतून अन्यत्र तर त्याची अन्य चौकीमध्ये बदली झाली असून प्रभारी म्हणून काम करीत आहे. तेथेच नेमणुकीला असलेला एक सहाय्यक निरीक्षक हा साहेबांचे त्या महिला अधिकाऱ्याबद्दल काय मत आहे, ते तिचा उल्लेख कसा करतात, याबाबत अन्य एका तिऱ्हाईत व्यक्तीला माहिती देताना अ‍ॅडिओ रेकॉर्डिंग केले आहे.
संबंधित वरिष्ठ महिला निरीक्षकेला त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर थेट आयुक्ताकडे धाव घेतली. यापूर्वी एका शाखेत काम करीत असतानाही हा अधिकारी आपल्याबद्दल अश्लील वक्तव्य करीत होता, आता बदली झाल्याने त्याच्याशी आपला काहीही संबंध येत नाही. तरीही माझ्याबद्दल जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे आपली प्रतिमा मलीन झाली असून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे या महिलेने आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Web Title: Police foxes pornography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.