पोलिसांना मिळणार मुख्यमंत्री पदक
By admin | Published: July 9, 2015 02:13 AM2015-07-09T02:13:10+5:302015-07-09T02:13:10+5:30
गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिसांना आता ‘मुख्यमंत्री पदक’ या विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून पोलिसांना दिले जाणारे हे पहिलेच महत्त्वपूर्ण पारितोषिक आहे.
जमीर काझी मुंबई
गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिसांना आता ‘मुख्यमंत्री पदक’ या विशेष सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून पोलिसांना दिले जाणारे हे पहिलेच महत्त्वपूर्ण पारितोषिक आहे.
फौजदारी खटल्यातील गुन्हेसिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध स्तरांवरील पोलिसांना उल्लेखनीय कामगिरीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वर्षभरातील कामगिरीच्या आधारावर पोलीस महासंचालकांकडून दरवर्षी या गुणवंतांची निवड केली जाईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष समारंभात हा पुररस्कार बहाल करण्यात येणार आहे.
विविध चार प्रकारच्या खटल्यांप्रकरणी सर्वोत्कृष्ट कनिष्ठ व वरिष्ठ तपासणी अधिकाऱ्यांना सन्मानित केले जाईल. केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकानंतर मुख्यमंत्री पदकाचे महत्त्व असेल. राज्यात एकीकडे गुन्ह्यांचा आलेख वाढत असताना पोलिसांनी तपास केलेल्या खटल्यांतील दोषारोप सिद्धतेचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे खात्याच्या कार्यक्षमतेबाबत टीका होत असते. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन कॉँग्रेस सरकारने नेमलेल्या विशेष समितीने १४ शिफारशी सुचविल्या. मुख्यमंत्री पदक हीदेखील त्या शिफारशींपैकी एक भाग आहे. विविध ठिकाणचे आयुक्त व अधीक्षक त्यासाठी अधिकाऱ्यांची समिती नेमून सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांच्या नावांच्या शिफारशीचे प्रस्ताव बनवून पोलीस मुख्यालयात पाठवतील. पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखालील समिती या सर्व प्रस्तावांचा विचार करून पुरस्कार विजेते ठरवेल. निवड करताना संबंधितांच्या एक वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत केलेले तपास कामे व खटल्याच्या निकालाचे मूल्यमापन केले जाईल.