सुषमा अंधारेंना धक्का! ‘त्या’ प्रकरणी संजय शिरसाटांना क्लीन चिट; पोलीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 11:39 AM2023-05-31T11:39:18+5:302023-05-31T11:43:11+5:30
Sanjay Shirsat-Sushma Andhare: एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
Sanjay Shirsat-Sushma Andhare: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल होती. मात्र, या प्रकरणी आता संजय शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल एक विधान केले होते. या वक्तव्याच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी परळी येथे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संजय शिरसाट यांनी केलेले विधान संभाजीनगर येथील असल्याचे सांगत हे प्रकरण संभाजी नगर पोलिसांकडे पाठवण्यात आले. तेथील पोलिसांनी याची चौकशी केली होती.
विनयभंग प्रकरणात संजय शिरसाट यांना क्लीन चिट
सुषमा अंधारे यांनी काही आक्षेप घेतले होते. विनयभंग, बदनामी आणि अब्रू नुकसानीचा दावा त्यांनी केला होता. तर या प्रकरणात पोलिसांनी तपास केला. पोलिसांनी सांगितले की, सुषमा अंधारे यांनी वेगवेगळ्या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. विनयभंग प्रकरणात संजय शिरसाट यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या संबधीचे पत्र सुषमा अंधारे यांना चार दिवसांपूर्वी पाठवण्यात आले आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावेळी सुषमा अंधारे तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे समोर व्यक्ती नसल्यामुळे विनयभंग होत नाही, असा निष्कर्ष देण्यात आला आहे.
दरम्यान, मी वारंवार सांगितले होते की, मी काहीही चुकीचे वक्तव्य केलेले नव्हते. एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. आता तरी त्यांना समजावे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.