बाप्पांसाठी पोलिसांचा ३२ तास खडा पहारा

By admin | Published: September 18, 2016 12:23 AM2016-09-18T00:23:08+5:302016-09-18T00:23:08+5:30

आनंदोत्सवामध्ये आपले कर्तव्य निभावणारी खाकी तब्बल ३२ तासांपेक्षा अधिक काळ ‘खडा पहारा’ देत उभी होती.

Police guard for 32 hours for the father | बाप्पांसाठी पोलिसांचा ३२ तास खडा पहारा

बाप्पांसाठी पोलिसांचा ३२ तास खडा पहारा

Next


पुणे : भाविकांच्या झुंडी... बेभान होऊन नाचणारी तरुणाई... विसर्जन मार्गांवरच्या दिमाखदार मिरवणुका... आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर झळकणारा उत्सवाचा उत्साह... या ओसंडणाऱ्या आनंदोत्सवामध्ये आपले कर्तव्य निभावणारी खाकी तब्बल ३२ तासांपेक्षा अधिक काळ ‘खडा पहारा’ देत उभी होती.
मिरवणुका पाहण्यासाठी लोटलेल्या जनसागरातच आपल्या कुटुंबीयांसोबत असल्याची भावना उराशी बाळगत पोलीस नावाचा ‘माणूस’ उभा होता संरक्षणासाठी. विशेष म्हणजे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह महिला पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्तामध्ये दबदबा पाहायला मिळाला.
दहा दिवस शांततेत पार पडल्यानंतर पोलिसांसमोर विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आव्हान होते. प्रतिवर्षीप्रमाणे बंदोबस्ताची आखणी करताना कमी मनुष्यबळात चांगला बंदोबस्त पार पाडण्याचे नियोजन पोलिसांनी केले होते. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यांसह बेलबाग आणि टिळक चौकांमध्ये विशेष बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली होती. लोकांची सुरक्षा, शांततापूर्ण मिरवणूक, गर्दीचे नियंत्रण, छेडछाड प्रतिरोध आणि वाहतुकीचे नियोजन अशा पंचसूत्रींवर आधारलेला बंदोबस्त यशस्वी झाला.
मुख्य विसर्जन मार्गांवर तब्बल ८०० पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला होता. लक्ष्मी रस्त्यावरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठीच्या बंदोबस्तासाठी बेलबाग चौक आणि टिळक चौकामध्ये मोठी कुमक ठेवण्यात आली होती, तर विसर्जन मार्गावर ढकल पथकांसह विविध पथके नेमण्यात आलेली होती. गर्दीचे नियंत्रण करण्यामध्ये पोलीसमित्र आणि कार्यकर्त्यांची मोठी मदत पोलिसांना झाली. बेलबाग चौकात स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला बसून होत्या. सहआयुक्त सुनील रामानंद बेलबाग चौक आणि अलका चौकात फिरून देखरेख ठेवली, तर अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे बेलबाग चौकामध्ये विशेष लक्ष ठेवून होते. टिळक रस्त्यावर साधारणपणे २५० पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे स्वत: या बंदोबस्ताचे नियंत्रण करीत होते. त्यांच्या मदतीला सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षकांची फौजही तैनात होती. टिळक रस्त्यावर स्पीकर लावणारी मंडळे अधिक असल्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती. त्याचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने झाले.
सर्व नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना उत्सवाचा आनंद गेल्या दहा दिवसांत लुटता आला. स्वत:च्या कुटुंबापासून सणावाराला दूर राहून इतरांच्या आनंदात आनंद मानणारे पोलीस मात्र दिवस-रात्र रस्त्यावर उभे होते. काही पोलिसांनी कर्तव्य बजावताना मार खाल्ला, शेकडो पोलिसांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या, काही जणांना सलाईन भरावे लागले, कोणाला रक्तदाबाचा त्रास झाला. त्याही स्थितीमध्ये पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू दिली नाही. धार्मिक सौहार्द टिकवण्यातही यश मिळवले. पोलिसांनी डोळ्यात तेल घालून ठेवलेल्या खड्या पहाऱ्यामुळे लोकांच्या आनंदात भर पडली.
>जीपीआरएसचा नावीन्यपूर्ण उपक्रम जीपीआरएस सिस्टीमद्वारे मानाच्या आणि महत्त्वाच्या गणपतींचे नेमके ठिकाण, गर्दीची स्थिती यावर लक्ष ठेवण्यात येत होते. या वर्षी उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या संकल्पनेमधून ही कल्पना राबवण्यात आली. गणपती मंडळांच्या रथाला जीपीआरएस सिस्टीम डिव्हाईस बसवण्यात आलेले होते. पोलीस नियंत्रण कक्ष तसेच अधिकाऱ्यांच्या लॅपटॉपमध्ये मंडळ नेमके कोठे आहे, हे समजू शकत होते.
>महिला ‘सिंघम’चा दबदबा
बेलबाग चौकामध्ये पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला स्वत: रात्रभर बसून होत्या. परिमंडल चारच्या हद्दीत उपायुक्त कल्पना बारवकर, चतु:शृंगीला सहायक आयुक्त वैशाली जाधव माने, बेलबाग चौकामध्ये सहायक आयुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे, नीला उदासिन, प्रतिभा जोशी महिला अधिकारी कणखरपणे उभ्या होत्या, तर टिळक चौकामध्ये पोलीस निरीक्षक क्रांती पवार, खंडूजी बाबा चौकामध्ये डेक्कनच्या वरिष्ठ निरीक्षक सुषमा चव्हाण, निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकलेही नेमणुकीस होत्या.
टिळक रस्त्यावर तीन महिला उपनिरीक्षकांसह पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी बंदोबस्त बजावला. यासोबतच लष्कर भागात पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, कोथरुड भागात निरीक्षक राधिका फडके, वारजे हद्दीत वरिष्ठ निरीक्षक अनुजा देशमाने बाजू सांभाळत होत्या. महिला सहाय्य कक्षाच्या उपनिरीक्षक संगीता जाधव, योगिता कुदळेही तपास पथकाद्वारे लक्ष ठेवून होत्या.
गणेशोत्सवादरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छेडछाड करणाऱ्या ५२१ जणांवर कारवाई केल्याने मिरवणुकीमध्ये वचक कायम राहिला. पोलीस नियंत्रण कक्ष आणि पोलीस मदत केंद्रामध्ये एकाही महिलेने येऊन छेडछाडीची तक्रार दिली नाही.
सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही मॉनिटरिंग रूममधून लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यावरच्या मिरवणुकीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार मॉनिटरिंग रूममधून मिरवणुकीचे नियंत्रण करीत होते.
विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी गुरुवारी सकाळी आठ वाजता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यापूर्वी बुधवारी सकाळी दहा ते रात्री आठ असे सलग दहा तास मुख्यालयात पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. बंदोबस्ताच्या सूचना, बंदोबस्ताची ठिकाणे, शंका, अडचणींसह तालीम घेण्यात आली होती. गुरुवारी सकाळी आठ वाजता तैनात करण्यात आलेला बंदोबस्त शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास सोडण्यात आला. सलग ३२ तास रस्त्यावर उभे असलेले पोलीस दुसऱ्या दिवशी त्याच जोमात त्यांच्या दैनंदिन कर्तव्यावर हजर झालेले होते.
मध्यवर्ती भागामध्ये आठ ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आलेली होती. या केंद्रांवरून चुकलेले, हरवलेले यांना मदत देण्यात येत होती. यासोबतच मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील तक्रारदारांना मार्गदर्शन करून पोलीस चौकी अथवा पोलीस ठाण्यांमध्ये पाठवण्यात येत होते.

Web Title: Police guard for 32 hours for the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.