कापशी गावात पोलिसांचा धुडगूस!
By admin | Published: April 23, 2015 05:25 AM2015-04-23T05:25:06+5:302015-04-23T05:25:06+5:30
शहरापासून जवळच असलेल्या कापशी (जुनी) गावात मंगळवारी जुगारावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी गावात
सचिन राऊत, अकोला
शहरापासून जवळच असलेल्या कापशी (जुनी) गावात मंगळवारी जुगारावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी गावात रात्रभर धुडगूस घातला. तब्बल २०० पोलिसांच्या जमावाने १०० हून अधिक दुचाकींची तोडफोड केली. गरोदर महिला, वृद्ध, मुलांना घराबाहेर काढून, तर काहींच्या घरात घुसून पोलिसांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांच्या या ‘गुंडगिरी’ने संपूर्ण गाव दहशतीत आहे.
गृहराज्यमंत्री (शहर) व अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घटनेची माहिती घेतली असून निष्पाप ग्रामस्थांना त्रास देणे मुळीच समर्थनीय नसल्याचे स्पष्ट केले. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
कापशी येथील तलावाच्या काठावर दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुगार खेळला जातो. जुगाराचे प्रमाण एवढे मोठे असते की, परिसराला यात्रेचे स्वरूप येते. मंगळवारी जुगारावर छापा मारण्यासाठी पातूर पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी किरकोळ कारवाई केली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने साध्या वेशात छापा मारला. त्यात काही जुगाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर विशेष पथक व यात्रेकरूंमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र त्यानंतर तब्बल २०० पोलिसांचा ताफा कापशी येथे धडकला. त्यांनी संपूर्ण गावात प्रचंड नासधूस व तोडफोड केली. जयश्री विवेक मानतकर या गरोदर महिलेच्या पोटावर पोलिसांनी काठ्या टोचल्या. पोलिसांना रोखणाऱ्या विवेक मानतकर यांनाही बेदम मारहाण केली, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.