पोलिसाने तयार केले बॉम्ब हाताळणारे यंत्र
By admin | Published: July 4, 2015 12:52 AM2015-07-04T00:52:10+5:302015-07-04T00:52:10+5:30
राज्यातील पहिलेच यंत्र : १२ किलो वजन उचलण्याची क्षमता
कोल्हापूर : कोणतेही अभियांत्रिकी शिक्षण नाही...फक्त अनुभवाची शिदोरी...या बळावर बारावी उत्तीर्ण इतकेच शिक्षण झालेल्या पोलीस नाईक हृषीकेश विजयकुमार ठाणेकर यांनी बॉम्ब हाताळणारे (रिमोटली आॅपरेट व्हेईकल) यंत्र तयार करण्याची किमया केली आहे. राज्यातील हे पहिलेच यंत्र असून भविष्यात यामुळे बॉम्बस्फोटासारख्या गंभीर घटना टळून लोकांचे प्राण वाचू शकतील. या यंत्राचा लवकरच पोलीस दलात समावेश झाला तर नवल वाटायला नको.
ठाणेकर हे मूळचे मलकापूरचे असले तरी त्यांचे वडील पोलीस दलात असल्याने त्यांचे संपूर्ण वास्तव्य कोल्हापुरात गेले. सध्या ते कळंबा रिंगरोडवरील प्रथमेशनगर येथे राहतात. सेवा बजावताना वडिलांचे निधन झाले. अचानक ओढावलेल्या संकटाने कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांच्या जागेवर हृषीकेश यांना पोलीस दलात नोकरी मिळाली. कोल्हापुरातील बॉम्बशोध व नाशक पथकात त्यांची नियुक्ती झाली. पुण्यातील एम.आय.एम. इन्स्टिट्यूट येथे पंधरा दिवसांचे प्रशिक्षण घेऊन ते सेवेत रूजू झाले.
दोन वर्षांपूर्वी कागल तालुक्यात जिवंत बॉम्ब सापडले. ते निकामी करताना अनेक जणांचे प्राण पणाला लागले होते. त्या दिवसापासूनच अशाप्रकारचे बॉम्बला मानवी हात न लागता त्याची परस्पर कशा पद्धतीने विल्हेवाट लावता येईल. याबाबत मनाशी खूणगाठ बांधून ठाणेकर यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. आठ महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना बॉम्ब हाताळणारे प्राथमिक स्तरावरील यंत्र दाखवून प्रात्यक्षिक सादर केले. ज्याच्याकडे कोणतीही अभियांत्रिकीची पदवी नाही; निव्वळ अनुभवाच्या जोरावर केलेला यशस्वी प्रयत्न पाहून पोलीस अधीक्षकांनी त्यांना परवानगी दिली. त्या प्रेरणेने ठाणेकर यांनी काम सुरू केले.
अगदी स्वस्तातील व बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूपासून त्यांनी यंत्राची निर्मिती सुरू केली. खुल्या जागेवर कुठेही जाणारे हे रिमोटवरील यंत्र संशयास्पद वस्तू उचलून बाजूला नेऊन ठेवू शकते. १२ किलोपर्यंतचे ओझे ते उचलू शकते. त्याची लांबी ३० इंच व रुंदी २४ इंच इतकी आहे. या यंत्राचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून ते रिमोटद्वारे बॉम्बसदृश वस्तू सुरक्षितस्थळी नेऊन ठेवू शकते. हे यंत्र अडचणीच्या ठिकाणी कुठेही जाऊ शकेल, यासाठी त्याला लागणारी चाके यांचे काम सध्या सुरू असून ते १० टक्के आहे तसेच यंत्राच्या हँड व आर्मवरील जागेचे ५ टक्के बाकी आहे. त्यावर बॉम्ब निकामी करण्याचे यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रासाठी ४० हजार रुपये इतका खर्च झाला असून त्याला लागणारे साहित्य बाजारात कमी खर्चात व सहज उपलब्ध होणारे आहे.
बॉम्ब हाताळणाऱ्या यंत्राच्या निर्मितीसाठी पोलीस अधीक्षकांनी दिलेली परवानगी हीच आपल्या कामाची पोहोच पावती आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात गडचिरोलीच्या नक्षलवादीविरोधी पथकासमोर यंत्राचे प्रात्यक्षिक झाले आहे. हे यंत्र फक्त बॉम्ब हाताळू शकते. त्यापुढेही जाऊन बॉम्ब निकामी करण्याची यंत्रणा यावर बसवून एक परिपूर्ण व सक्षम यंत्र लवकरच सर्वांसमोर आणले जाईल.
-हृषीकेश ठाणेकर, पोलीस नाईक, शाहूपुरी पोलीस ठाणे