रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवत पोलीसानेच तरूणांना घातला गंडा
By Admin | Published: July 25, 2016 03:17 PM2016-07-25T15:17:29+5:302016-07-25T15:18:41+5:30
माझी रेल्वे प्रशासनात खूप ओळख आहे, एका झटक्यात तुम्हाला नोकरी लावतो अशा थापा मारत पोलीसांनीच पाच सुशिक्षित तरूणांना लाखो रुपयांचा गडा घातला.
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २५ - माझी रेल्वे प्रशासनात खूप ओळख आहे, एका झटक्यात तुम्हाला नोकरी लावतो, काही काळजी करू नका या व अशा अनेक थापा मारून करमाळा परिसरातील पाच सुशिक्षित बेकार तरूणांना लाखो रूपयांस चक्क पोलीसांनीच गंडविल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात घडली आहे़
याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर निवृत्ती मारकड (बक्कल नंबर ४०, नेमणूक कुर्डूवाडी) व त्याचा नातेवाईक बाळासाहेब मारकड (रा़ नातेपुते, ता़ माळशिरस) या दोघांविरूध्द करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नागेश बरडे हा २००९ साली हडपसर (पुणे) येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत होता़ त्यावेळी त्याची दिगंबर मारकड या पोलिसाबरोबर ओळख झाली होती़ त्यावेळी दिगंबरने बाळासाहेब मारकड हा सीए आहे आणि तो तरूणांना रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून साडेचार लाख रूपयांची मागणी केली़ या पैशाच्या मागणीप्रमाणे नागेश बरडे, सद्दाम पठाण, आरिफ शेख, बापू मोटे (रा़ धायखिंडी) यासह अन्य तरूणांनी पैसे दिले़ याचवेळी पुण्यात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मारकड याने जॉयनिंग लेटर आणून देतो म्हणून सर्वांना गावाकडे पाठवून दिले़ त्यानंतर ट्रेनिंगसाठी जायचे म्हणून त्यांना मोटारीतून नागपूर येथे पाठविले़ १५ दिवस नागपूरला लॉजमध्ये ठेवल्यानंतर मारकड यांनी आता तुमचे काम झाले आहे तुम्ही गावाकडे जावा मी जॉयनिंग लेटर आणून देतो असे सांगितले होते़ मात्र अद्यापही जॉयनिंग लेटर मिळाले नाही़ फसवणुक झाल्याची समजताच नागेश बरडे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार बोधनपोड हे करीत आहेत़ या घटनेने बेरोजगार तरूणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.