आॅनलाइन नोंदीबाबत पोलीस उदासीन
By admin | Published: January 10, 2016 12:49 AM2016-01-10T00:49:38+5:302016-01-10T00:49:38+5:30
गुन्हा घडल्यानंतर त्याची नोंद ‘आॅनलाईन’ स्टेशन डायरीत करण्याची प्रणाली पोलीस ठाण्यांमध्ये उभारण्यात आली आहे. मात्र अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे
- एकनाथ पाटील, कोल्हापूर
गुन्हा घडल्यानंतर त्याची नोंद ‘आॅनलाईन’ स्टेशन डायरीत करण्याची प्रणाली पोलीस ठाण्यांमध्ये उभारण्यात आली आहे. मात्र अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अवघड झाल्याने स्टेशन डायरीची पारंपरिक पद्धतच संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सुरू आहे.
केंद्रीय गृहखात्याने २०१४ मध्ये गुन्ह्यांची माहिती संकलित करणे, वेळेत वरिष्ठांना पाठविणे, वेळेत निर्गती करणे आदी मुद्यांचा विचार करून ‘क्राईम क्रिमीनल ट्रॅकिंग अॅन्ड नेटवर्किंग सिस्टीम’ ही कार्यप्रणाली बनविली आहे. या माध्यमातून संपूर्ण देशभरातील पोलीस ठाणी एकमेकांशी आॅनलाईनद्वारे जोडली गेली आहेत.
आजही राज्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात आॅनलाईन डायरी हाताळण्याचे काम अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना येत नसल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्यात किंवा पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकाऱ्यांच्या टेबलवर असलेल्या संगणक फक्त ‘शो-पीस’च बनले आहेत. नवीनच भरती झालेल्या पोलिसांकडून ते माहिती करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. डायरी मराठीत नोंदवायची असल्याने या नव्या पोलिसांना टायपिंग येत नसल्याने तीसुद्धी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्याचे काम आॅनलाईन करण्यात आले आहे. परंतु कोल्हापुरात आॅनलाईन डायरीला स्टेशन डायरीची जोड देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातील जुन्या कर्मचाऱ्यांना ही आॅनलाईन डायरी नीट हाताळता येत नसल्याने ते आजही स्टेशन डायरीचा आधार घेतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज १ जुलै २०१५ पासून आॅनलाईन सुरू आहे. काही कर्मचारी पूर्ण प्रशिक्षित नसल्याने ते आजही स्टेशन डायरीचा वापर करीत आहेत. स्टेशन डायरीच्या सवयीतून काही कर्मचारी अद्याप बाहेर पडलेले दिसत नाहीत. लवकरच सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी पूर्णत: प्रशिक्षित होतील.
- भारतकुमार राणे,
शहर पोलीस उपअधीक्षक