पोलिसांचा चौकशी अहवाल फुटला?
By admin | Published: October 26, 2015 02:37 AM2015-10-26T02:37:13+5:302015-10-26T02:37:13+5:30
निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा गोपनीय चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर होण्यापूर्वीच फुटल्याची चर्चा आहे
जळगाव/नाशिक : निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा गोपनीय चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर होण्यापूर्वीच फुटल्याची चर्चा आहे. रविवारी सोशल मीडियावर हा १३ पानी अहवाल व्हायरल झाला. पोलिसांनी मात्र तो अधिकृत अहवाल नसल्याचा दावा केला आहे.
सादरे यांनी १६ आॅक्टोबरला नाशिक येथे आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू व्यापारी सागर चौधरी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी एक चौकशी पथक तयार केले. विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीतसिंग यांनीही विभागीय चौकशी सुरू केली होती. त्यात रायते यांची नाशिक येथे बोलावून चौकशी केली, तर डॉ.सुपेकर यांचेही लेखी म्हणणे घेतले आहे. हा चौकशी अहवाल सोमवारी महासंचालकांना सादर केला जाणार होता. त्यापूर्वीच रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेला अहवाल त्यांचाच असल्याची चर्चा सुरू झाली. (प्रतिनिधी)