लाचखोर सहाय्यक उपनिरीक्षकासह पोलीस शिपाई अटकेत
By admin | Published: October 20, 2016 09:09 PM2016-10-20T21:09:39+5:302016-10-20T21:09:39+5:30
कारवाई करुन अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून चार हजाराची लाच स्विकारल्यानंतर दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक चिंतामण महानर आणि पोलीस शिपाई अफजल
ऑनलाइन लोकमत
शिंदखेडा, दि. २० : कारवाई करुन अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून चार हजाराची लाच स्विकारल्यानंतर दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक चिंतामण महानर आणि पोलीस शिपाई अफजल पिंजारी यांना रंगेहात पकडण्यात आले़ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरूवारी सायंकाळी सापळा रचुन ही कारवाई केली़
तक्रारदार यांचे शालक गोपाळ सुभाष खटके यांनी त्याच्याविरूध्द दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ त्यांची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंतामण बंडु महानर यांच्याकडे होती. तक्रारदाराने आपल्यावर कारवाई करून अटक करु नका, असे सांगितले़ तेव्हा महानर यांनी कारवाई न करण्यासाठी ५ हजाराची लाच मागितली. त्यावेळी तक्रारदाराने ठिक आहे, असे सांगुन निघुन गेले होते़ त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली़ त्यानुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता चिंतामण महानर व पोलीस शिपाई अफजलखान रशीद पिंजारी या दोघांनी तक्रारदारकडे तडजोडीअंती ४ हजार रूपये लाचेची मागणी केली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यानुसार गुरुवारी लाचची रक्कम स्विकारल्यानंतर दोघांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पथकातील उप अधीक्षक सुनिल गांगुर्डे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पो़ना संदीप पाटील, देवेंद्र वेंन्दे, पोक़ॉ संदीप सरग, संतोष माळी, प्रशांत चौधरी यांनी केली़