चोरट्यांच्या मारहाणीत पोलीस निरीक्षक जखमी
By admin | Published: January 30, 2017 03:55 AM2017-01-30T03:55:34+5:302017-01-30T03:55:34+5:30
शहरातील हसमुख कॉलनी व सातोना रस्त्यावरील दोन घरांवर रविवारी पहाटे चोरट्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एक दाम्पत्य जखमी झाले
सेलू (जि. परभणी) : शहरातील हसमुख कॉलनी व सातोना रस्त्यावरील दोन घरांवर रविवारी पहाटे चोरट्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एक दाम्पत्य जखमी झाले तर, चोरट्यांसोबतच्या धुमश्चक्रीत पोलीस निरीक्षकही जखमी झाला.
रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास हसमुख कॉलनीत राहणारे ग्रामसेवक उद्धव नामदेव नागरे यांच्या घराचे गेट तोडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. नागरे दाम्पत्य जागे होताच त्यांना चोरट्यांनी रॉडने मारहाण केली. यात नागरे यांच्या पत्नी कुशावर्ता यांच्या चेहऱ्याला तर उद्धव नागरे यांच्या पाठीत मुका मार लागला आहे. चोरट्यांनी नागरे यांच्या कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिने व तीन मोबाईल असा ऐवज लांबविला.
याच चोरट्यांनी आपला मोर्चा नजीकच्या सातोना रस्त्यावरील पोलीस निरीक्षक जे.जे. राठोड यांचे जावई प्रधान आढे यांच्या घराकडे वळविला. साधारणत: ३.३०च्या सुमारास स्वयंपाकघराचे दार तोडून चोरटे आढे यांच्या घरात घुसले. आढे दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवून घरातील सोन्या-चांदीचे दागिने हिसकावून घेतले.
हा प्रकार सुरू असताना घरातील एकाने पोलीस निरीक्षक राठोड यांना फोनद्वारे ही माहिती दिली. राठोड हे आपला मुलगा संतोष याला घेऊन दुचाकीने आढे यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर राठोड आणि चोरटे यांच्यात झटापट झाली. राठोड यांनी काठीने दोन चोरट्यांना बदडले. राठोड यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे. (वार्ताहर)