पोलीस निरीक्षक रायतेंची चौकशी
By admin | Published: October 22, 2015 01:28 AM2015-10-22T01:28:49+5:302015-10-22T01:28:49+5:30
जळगाव येथील निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणातील संशयित तथा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांची नाशिक
नाशिक : जळगाव येथील निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणातील संशयित तथा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजित सिंह यांनी बुधवारी दिवसभर चौकशी केली़
चौकशीत सादरे यांनी केलेल्या आरोपांचा रायते यांनी इन्कार केला असून, तसा लेखी जबाबही महानिरीक्षकांकडे सोपविला आहे़ विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, प्रभाकर रायते यांची खातेअंतर्गत विभागीय चौकशी होणार आहे़ त्यानुसार बुधवारी रायते यांची चौकशी झाली. त्यांनी दिलेल्या लेखी जबाबात सादरे यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत केलेले सर्व आरोप फेटाळून, रामानंदनगर पोलीस ठाण्यातील बदली सदरे यांच्या कामकाजाच्या सोईने झाली होती. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे लेखी जबाबात म्हटले आहे़
जळगावमधील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले ‘दिवाळी सोने’ या बातम्या, तसेच टीव्ही चॅनलवर दाखविल्या गेलेल्या आॅडिओ क्लिपबाबतची चौकशी करण्यात आली नसल्याचे सादरे यांनी चिठ्ठीत लिहिलेले आहे़ या बातम्यांची व आॅडिओ क्लिपची जळगावच्या पोलीस उपअधीक्षकांनी (गृह) चौकशी करून अहवाल दिल्याचेही रायते यांनी जबाबात म्हटले आहे़
तपास पथक जळगावला
पंचवटी पोलीस ठाण्यात सादरे आत्महत्याप्रकरणी संशयित सुपेकर, रायते व चौधरी यांच्याविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे़ महत्त्वाच्या कागदपत्रांच्या तपासासाठी नाशिकचे सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक जळगावला गेले होते़ त्याने जळगावला दिवसभर चौकशी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली.
संशयितांना अटक केव्हा?
सादरे आत्महत्या प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला असून, पोलिसांचा चौकशीचा फार्स सुरू आहे़ सर्वसामान्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाते. मात्र, यामध्ये संशयित बडे पोलीस अधिकारी असल्याने त्यांना पोलीस सखोल चौकशीच्या नावाखाली जाणीवपूर्वक वेळ देत असल्याचा आरोप केला जात आहे़ संशयितांना ताब्यात घेऊन नंतर चौकशी करावी, अशी तक्रारदारांची मागणी आहे़