शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार
By Admin | Published: October 5, 2016 06:00 AM2016-10-05T06:00:18+5:302016-10-05T06:00:18+5:30
विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीवर काढण्यात आलेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले.
औरंगाबाद : विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीवर काढण्यात आलेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले. मुख्यमंत्री किंवा शिक्षणमंत्र्यांनी निवेदन स्वीकारायला स्वत: येथे यावे, असा आग्रह धरीत शिक्षकांनी सुरक्षाकडे तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. तर शिक्षकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या धुमश्चक्रीत २१ शिक्षकांसह ९ पोलीस जखमी झाले.
विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे, अशी संस्थाचालक व शिक्षकांची मागणी होती. मात्र, शासनाने सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. कृती समितीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
क्रांतीचौकातून मोर्चाला सुरुवात झाली. शासनाविरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा आमखास मैदानातील जामा मशीद चौकात आला. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून मोर्चेकऱ्यांसाठी प्रशासनाने आमखास मैदानात थांबण्याची व्यवस्था केली. मात्र, आंदोलक शिक्षकांनी मैदानात जाण्यास नकार देत चक्क जामा मशीद चौकातच ठिय्या मांडत रास्ता रोको केला. शिक्षकांच्या पवित्र्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक कोलमडली. शिवाय, अन्य पक्ष- संघटनांचे मोर्चेही खोळंबले. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.
चिथावणीखोर भाषणाने भडका
शिक्षकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्यानंतर तेथे कुणीही उठून भाषणबाजी सुरू केली. सुरुवातीला अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत असलेल्या या मोर्चात अचानक काही जणांनी चिथावणीखोर भाषणे सुरू केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत येथून उठायचेच नाही. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांनी येथे येऊन आपले निवेदन स्वीकारावे, अन्यथा आपण धडा शिकवू, अशी चिथावणीखोर भाषणबाजी आणि पोलिसांच्या दांडगाईने हा जमाव बिथरला.
पोलीस हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू
शिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमारानंतरच्या धावपळीत पोलीस हवालदार राहुल प्रकाश कांबळे (५३) यांचा सायंकाळी हदयविकाराने मृत्यू झाला. कांबळे हे मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी त्यांना औरंगाबादला ड्युटी देण्यात आली होती.
जखमी शिक्षक व पोलिसांची नावे
पोलीस कर्मचारी विशाल धोत्रे (रा. ठाणे), जी. आर. शेख (रा. औरंगाबाद), अब्दुल खालीद यांच्यासह नऊ जणांचा जखमींमध्ये समावेश आहे. सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनाही या वेळी दगड
लागले. जखमी शिक्षकांमध्ये सचिन कदम, उषा कदम, खंडेराय जगदाळे, समाधान कोल्हे, अनिता चव्हाण, गजानन ढोले, नीलेश गरुड, गजानन गायकवाड, यादव शेळके, विनोद शेळके, वहीद शेख, विजय कव्हर, विश्वनाथ मुंडे, नवनाथ मंत्री, के. पी. पाटील, कन्हैया विसपुते, शिवाजी धन्वे यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे. सर्व जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.