बेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार; सीमाभागात आज काळा दिन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 01:05 PM2018-11-01T13:05:06+5:302018-11-01T13:25:14+5:30
बेळगाव, बिदर, भालकीसह सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्याविरोधात आज बेळगावमध्ये 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला.
मुंबई : बेळगाव, बिदर, भालकीसह सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्याविरोधात आज बेळगावमध्ये 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी म. ए. समितीकडून आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीवर कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला आहे.
बेळगाव, बिदर, भालकीसह मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी तरुणांनी काढलेल्या सायकल रॅलीवर कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला. आजच्या 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती. यावेळी बेळगावसह बिदर, भालकी, कारवारचा मराठी भाषिक भाग कर्नाटकमध्ये डांबण्यात आला होता.
या दिवशी कर्नाटककडून आणि कन्नड रक्षण वेदिकेकडून बेळगावमध्ये कर्नाटकात राज्योत्सव साजरा केला जातो. तर त्याला विरोधम्हणून मराठी बांधवांकडून गेली 63 वर्षे मूक सायकल रॅली काढण्यात येते. या रॅलीवेळी आज बेळगाव गोवा वेस सर्कलजवळ लाल पिवळे ध्वज घेऊन काही कन्नड कार्यकर्ते सामील झाल्याने गोंधळ निर्माण झाला. यामुळे पोलिसांनी मराठी तरुणांनी काढलेल्या मूक सायकर रॅलीवर लाठीमार केला. फटाके फोडल्याने संभ्रम निर्माण झाला होता.