पुरावे शोधण्यासाठी पोलिसांचा आटापिटा!
By admin | Published: August 31, 2015 02:09 AM2015-08-31T02:09:58+5:302015-08-31T02:09:58+5:30
शीना बोराच्या मृतदेह अवशेषांचा डीएनए चाचणी अहवाल नकारार्थी आला तर मात्र पोलिसांसमोरील अडचणी वाढू शकतात आणि आरोपींना बचावाची संधी मिळू शकते.
मुंबई : शीना बोराच्या मृतदेह अवशेषांचा डीएनए चाचणी अहवाल नकारार्थी आला तर मात्र पोलिसांसमोरील अडचणी वाढू शकतात आणि आरोपींना बचावाची संधी मिळू शकते. हे ओळखून पोलिसांनी आरोपींविरोधातील अधिकाधिक परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पुरावे शोधण्यासाठी रविवारी पोलिसांनी तीन्ही आरोपींना पेणर्यंत नेले. एप्रिल २०१२मध्ये मुंबई ते पेण प्रवासात आरोपींनी कुठे पेट्रोल भरले, नाश्त्यासाठी कुठे थांबले त्या सर्व ठिकाणी आरोपींना नेले. तेथे साक्षीदार मिळतात का ते पाहिले. अवशेषांचीही चाचणी करण्यात जेजे रूग्णालयाने असमर्थता दर्शविली तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होऊ शकते, असा दावा पोलीस करत आहेत.
मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने चौकशीत सहकार्य केले नसले तरी तिचा दुसरा पती संजीव खन्ना व ड्रायव्हर श्याम राय यांनी शीनाची हत्या झाली, या हत्येत कोणी कसा सहभाग घेतला याची कबुली दिली आहे. हत्येत कमी सहभाग आढळल्यास रायला माफीचा साक्षीदार करण्याबाबत पोलिसांचे संकेत.
इंद्राणीच्या सांगण्यावरून शीनाच्या नावे मुंबई मेट्रो वन कंपनीला राजीनाम्याचा ईमेल धाडणाऱ्याची ओळख पटली असून त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नसली तरी तोही माफीचा साक्षीदार होऊ शकतो.
राहुललाही होती भीती : शीना अचानक गायब झाल्यानंतर राहुलही घाबरला होता. त्याने याबाबत आई शबनम यांच्याशी चर्चाही केली होती. शबनम यांनीच त्याला मुंबई सोडून देहरादूर येथे स्थायिक होण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तो देहरादून येथे शबनम यांच्यासोबत राहू लागला. तेथून तो शीनाचा शोध घेण्यास किंवा तीच्या गायब होण्यातले रहस्य उलगडण्यास अधूनमधून मुंबईत येत होता.
पीटर मुखर्जी यांचा पूत्र व शीनाचा प्रियकर राहुल याने जबाबात २४ एप्रिलला शीना इंद्राणीला भेटल्याचे सांगितले आहे.
शीनाचा सख्खा भाऊ मिखेलने पोलिसांना शीना हत्येशी संंबंधीत अनेक महत्वाचे पुरावे दिले आहेत.
देहरादून येथे शीनाचा पासपोर्ट सापडल्याने शीना अमेरिकेत आहे, ही इंद्राणीने मारलेली थाप उघड होते.
सुटकेस सापडली
इंद्राणी व पीटर मुखर्जी यांच्या वरळी येथील निवासस्थानी गॅरेजमधून खार पोलिसांनी एक सुटकेस हस्तगत केली आहे. ही सुटकेस मिखेल बोरा याच्या हत्येसाठी वापरण्यात येणार होती, असा संशय पोलिसांना आहे. मिखेल हा शीनाचा सख्खा भाऊ आणि इंद्राणी व सिद्धार्थ दास यांचा मुलगा आहे.
इंद्राणीविरोधात
स्वतंत्र गुन्हा?
मुंबई पोलीस इंद्राणी मुखर्जीविरोधात मिखेल बोराच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदविण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मिखेल हा शीना बोराचा सख्खा भाऊ असून शीना हत्याकांडात पोलिसांसाठी महत्वाचा साक्षीदार आहे. शीनाच्या हत्येच्या हेतूबाबत मिखेलने नेमकी माहिती पोलिसांना पुरवल्याचे समजते. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात इंद्राणीने आपल्याही हत्येचा दोनदा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पोलीस शीना बोरा हत्याकांडात इंद्राणीविरोधात हत्येचा प्रयत्न हे कलम जोडू शकतात किंवा स्वतंत्र गुन्हाही नोंदवू शकतात, असे समजते.
सिद्धार्थ दास यांचा
शोध सुरू
शीना बोराचे वडील सिद्धार्थ दास यांचा मुंबई पोलिसांकडून कसोशिने शोध सुरू आहे. ते जिवंत आहेत याबाबत पोलीस आश्वस्त असले तरी आठवडयाभरापासून शीना हत्याकांड देशभर गाजूनही ते पुढे आलेले नाहीत किंवा त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांचा जबाब पोलिसांसाठी महत्वाचा आहेच मात्र पेण, गागोदे खिंडीतून नव्याने सापडलेले मृतदेहाचे अवशेष शीनाचेच आहेत का हे स्पष्ट करणाऱ्या डीएनए चाचणीसाठी सिद्धार्थ यांची निकड पोलिसांना अधिक अस्वस्थ करते आहे.