वृद्ध प्रवाशांना लुटणारे तोतया पोलीस गजाआड
By admin | Published: August 4, 2014 03:32 AM2014-08-04T03:32:17+5:302014-08-04T03:32:17+5:30
गावातून येणाऱ्या प्रवाशांना पोलीस असल्याचे सांगून त्यांचे दागिने लुटणाऱ्या दोन तोतयांना भोईवाडा पोलिसांनी अटक केली.
मुंबई : गावातून येणाऱ्या प्रवाशांना पोलीस असल्याचे सांगून त्यांचे दागिने लुटणाऱ्या दोन तोतयांना भोईवाडा पोलिसांनी अटक केली. सतत सहा महिने या आरोपींवर पाळत ठेवून भोईवाडा पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून, आरोपींकडून पोलिसांनी १५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
राज्यातील विविध भागांतून दादर टीटी परिसरात अनेक एसटी तसेच खासगी बसगाड्या येतात. या बसमधून मुंबईत प्रथमच येणाऱ्या प्रवाशांना हे आरोपी आपण पोलीस असल्याची बतावणी करीत. ‘पुढे काही प्रवाशांना लुटारूंनी लुटले आहे. त्यामुळे तुमचे दागिने काढून बॅगमध्ये ठेवा,’ असे या आरोपींकडून सांगण्यात येत असे. पोलिसांप्रमाणेच केसांची स्टाईल, जॅकेट, गॉगल असा पेहराव असल्याने प्रवासीही या तोतयांवर विश्वास ठेवून दागिने काढून एका रुमालात बांधत. याचदरम्यान आरोपी हातचलाखीने प्रवाशांचा दागिने बांधलेला रुमाल काढून त्या ठिकाणी दगड बांधलेला रुमाल ठेवायचे. आॅक्टोबर २०१३पासून अशा प्रकारे ७ घटना या भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. त्यामुळे भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तोंडवळकर यांनी या तोतयांना पकडण्यास पथक स्थापन केले होते.
दरम्यान, हे आरोपी भिवंडी परिसरात राहत असल्याची माहिती पथकातील उपनिरीक्षक गायकवाड आणि सुर्वे यांना मिळाली. त्यांनी पथकातील विश्वास भोसले, सचिन घाडगे, राजा गायकवाड, प्रीतम शिंदे आणि ताजने यांच्या मदतीने संपूर्ण भिवंडी शहर शोधून काढले. त्यासाठी सहा महिने हे पथक भिवंडीमध्ये वास्तव्यास होते. याचवेळी हे आरोपी येथील शांतीनगर भागात राहत असल्याची माहिती एका इसमाने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस या परिसरातील एका इमारतीमध्ये शोध घेत असतानाच त्यांना एका फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद दिसला. या फ्लॅटच्या दरवाज्याला पाच कुलुपे लावण्यात आली होती. तसेच दरवाज्यावर सीसीटीव्ही कॅमेराही लावण्यात आला होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या फ्लॅटची सर्व कुलुपे तोडून आत प्रवेश केला असता तेथे अमजद बेग (३५) आणि गाझी जाफरी (२६) हे दोघे जण सापडले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सात गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ तोळे सोने हस्तगत केले असून, त्यांच्यावर भायखळा, ना.म. जोशी, चेंबूर, भांडुप, सायन आदी पोलीस ठाण्यांत ३०पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती तोंडवळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)