वर्ध्यात पोलिसांनीच केली लूटमार

By admin | Published: August 6, 2016 04:46 AM2016-08-06T04:46:26+5:302016-08-06T04:46:26+5:30

गृहरक्षकाची दुचाकी अडवून दारू वाहतुकीचा आरोप करीत त्याच्याकडील १५ हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी उघडकीस आली

Police looted in the year | वर्ध्यात पोलिसांनीच केली लूटमार

वर्ध्यात पोलिसांनीच केली लूटमार

Next


वर्धा : तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या एका साथीदाराने वाटसरू गृहरक्षकाची दुचाकी अडवून दारू वाहतुकीचा आरोप करीत त्याच्याकडील १५ हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी सावंगी पोलिसांत लूटमारीचा गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर गुरुवारी रात्री दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली. एका पोलीस कर्मचाऱ्याचा शोध सुरू आहे.
सचिन पांडुरंग सुरकार (२९), वैभव बाबाराव चरडे (२८) या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चंदन नारायण कडू (२६) या तिघांना अटक करण्यात आली असून प्रशांत वाटखेडे हा पोलीस कर्मचारी फरार आहे. गुन्हा दाखल असलेले तिघेही शहरात सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आलेल्या मार्शल पथकाचे कर्मचारी आहेत. या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
रामनगर येथील स्वप्नील राजेंद्र दांगट (३१) हे गृहरक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी ते मित्र संगम अमृतकर यांच्यासह दुचाकीने पारधीबेडा पांढरकवडा येथून वर्ध्याकडे येत होते. दरम्यान, दोन दुचाकीवरील चार इसमांनी त्यांना थांबविले. या चौघांनी आपण सांवगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी असल्याचे सांगत ‘तू दुचाकीवर दारूच्या डबक्या घेऊन जातो’, असा आरोप केला आणि ‘१५ हजार रुपये दे, अन्यथा पोलीस ठाण्यात नेऊन कारवाई करू’ अशी धमकी देत मारहाण केली. (प्रतिनिधी)
> दुचाकी गहाण
ठेवून दिले पैसे
पोलिसांनी मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याने धास्तावलेल्या राजेंद्र दांगट यांनी गावातील दोन व्यक्तींकडे दुचाकी गहाण ठेवून पैसे घेतल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना १५ हजार रुपये मिळताच त्यांनी दांगट यांना पारधी बेड्यावर सोडून पळ काढला.
>पोलीस विभागात कार्यरत असलेल्या या तीन कर्मचाऱ्यांनी केलेले हे कृत्य पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे आहे. त्यांना अभय देण्यात येणार नाही. त्यांना अटक करून निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
- अंकीत गोयल,
जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा

Web Title: Police looted in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.