राज्यभर ४५ वर्षांवरील पोलिसांच्या ११ प्रकारच्या मेडिकल टेस्ट!]
By admin | Published: July 6, 2017 04:58 AM2017-07-06T04:58:37+5:302017-07-06T04:58:37+5:30
राज्यभरातील पोलीस खात्यातील ४५ वर्षांवरील अधिकारी व अंमलदारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, कामाची जबाबदारी
जमीर काझी/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यभरातील पोलीस खात्यातील ४५ वर्षांवरील अधिकारी व अंमलदारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, कामाची जबाबदारी, ताणतणावामुळे त्यांना जडणाऱ्या विविध व्याधी व विकाराबाबतची पडताळणी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. राज्यातील विविध पोलीस घटकांतील प्रमुखांनी संबंधित जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये येत्या तीन महिन्यांत विविध ११ वैद्यकीय चाचण्या करावयाच्या आहेत. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात टप्प्याटप्प्याने ही मोहीम पूर्ण करावयाची आहे. यामध्ये जवळपास ६० हजार जणांची तपासणी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
राज्य पोलीस दलातील आयपीएस (भा.पो.से.)अधिकाऱ्यांची दरवषी ‘आॅनड्युटी’ वैद्यकीय तपासणी करून घेण्याची सवलत आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर ऊन, पावसाचा विचार न करता, बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या भोपोसे व्यतिरिक्त त्या खालचे अधिकारी व अंमलदारांना मात्र अशी सुविधा नाही. त्यामुळे आरोग्याबाबतच्या जागृतीसह विकारांबाबत वेळीच सावधगिरी बाळगून, प्रतिबंधक औषधोपचारासाठी ४५ वर्षांवरील पोलिसांच्या वैद्यकीय तपासण्या करण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. त्यानुसार, हवालदारापासून सहायक फौजदार व उपनिरीक्षकापासून ते उपायुक्त/अधीक्षक (मपोसे) दर्जाच्या अधिकाऱ्यांची तपासणी होणार आहे.
पोलीस घटकप्रमुखांनी अधिकारी व अंमलदाराच्या तपासणीचे नियोजन करण्यासाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावयाची आहे. त्यांनी त्याबाबत सरकारी रुग्णालयाच्या प्रमुखांशी संपर्क साधून, ३० सप्टेंबरपर्यंत तपासणीचे वेळापत्रक बनवायचे आहे. तपासणी झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदाराच्या तपासणीचा अहवाल, विहित नमुन्यामध्ये पोलीस मुख्यालयाकडे पाठवायचा आहे.
तीन कोटी खर्चाला मान्यता
एका पोलिसांच्या तपासणीसाठी ५०० रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. सव्वा दोन लाख मनुष्यबळ असलेल्या पोलीस दलामध्ये जवळपास ६० हजार जण ४५ वर्षांवरील आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी सरासरी एकूण ३ कोटी
रुपये खर्च मंजूर करण्यात आला
आहे.
या चाचण्या होणार
रक्त तपासणी (सीबीसी), मधुमेह, लिपीड प्रोफाइल टेस्ट, यकृत चाचणी, नेत्र, रक्तदाब, ईसीजी, ब्रॉयन्कायटिस रुग्णांसाठी छातीचा एक्स-रे आणि उंची व वजनाच्या प्रमाणात बॉडी मास इन्डेक्स या ११ प्रकारच्या चाचण्या सरकारी रुग्णालयात केल्या जाणार आहेत.