हत्येच्या कटात पोलीसही?
By admin | Published: June 18, 2016 05:48 AM2016-06-18T05:48:50+5:302016-06-18T05:48:50+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट एका पोलीस अधिकाऱ्याचाच सहभाग असल्याचा संशय सीबीआयला असून या दृष्टीने तपास सुरू आहे.
सीबीआयचा संशय : दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या तिन्ही हत्यांसाठी वापरले एकच पिस्तूल?
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट एका पोलीस अधिकाऱ्याचाच सहभाग असल्याचा संशय सीबीआयला असून या दृष्टीने तपास सुरू आहे. तसेच दाभोलकर यांच्या हत्येनंतर पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पिस्तुलानेच कॉ. गोविंद पानसरे व एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत स्कॉटलँड यार्डकडून अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सनातनच्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्यासोबत पुणे पोलीस दलातील एक अधिकारी संपर्कात होता, अशी माहिती एका साक्षीदाराच्या जबाबात समोर आली. सीबीआयने त्या अधिकाऱ्यावर दाभोलकर हत्येसंदर्भात मदत केल्याचा संशय व्यक्त केला आहे. कर्नाटकच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालावरून, दाभोलकर हत्येनंतर सीलबंद करून ठेवलेले पिस्तुल पानसरे आणि कलबुर्गींच्या हत्येसाठी वापरण्यात आले आणि नंतर ते पुन्हा सीलबंद करून ठेवण्यात आल्याची अटकळ सीबीआयकडून बांधली जात आहे. यावर सीबीआय सध्या काम करीत आहे. ‘तो’ अधिकारी नेमका कोण याचा उलगडा लवकरच होणार असल्याची माहिती आहे.
डॉ. दाभोलकरांची २० आॅगस्ट २०१३ रोजी हत्या झाल्यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या शस्त्रतस्करांकडून जप्त केलेले अग्निशस्त्र कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. त्यातूनच दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्याचा अहवाल या प्रयोगशाळेने दिला होता. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास करीत असलेल्या पुणे पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने हे पिस्तूल ताब्यात घेऊन डेक्कन पोलीस ठाण्यात विभागात ठेवले होते. (प्रतिनिधी)
सनातनचे शत्रू : दाभोलकर, करकरे, पानसरे
हिंदू धर्माविरोधात कारवाई करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे सनातनचे शत्रू होते, अशी स्पष्टोक्ती सनातनचे संघटक अॅड. संजीव पुनाळेकर यांनी दिली आहे.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत शत्रूत्त्वाची कबूली देतानाच पुनाळेकर यांनी या तिघांच्याही खूनात सनातनचा सहभाग नसल्याचेही स्पष्ट केले.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेला वीरेंद्र तावडे निर्दोष असून, सीबीआय खोटे पुरावे सादर करून तावडेंना अडकवत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याने सनातनला या प्रकरणात गोवले जात असल्याचे पुनाळेकर आणि अभय वर्तक यांनी सांगितले.
ताब्यातील पिस्तुलाचा वापर कसा?
पानसरे आणि एम.एम.कलबुर्गी या दोघांवरही दोन पिस्तुलांमधून गोळ्या झाडण्यात आल्याचे समोर आले होते. दाभोलकरांच्या हत्येमध्ये जे पिस्तूल वापरले गेले त्याच पिस्तूलामधून पानसरे आणि कलबुर्गींवर गोळ्या झाडण्यात आल्याचा अहवाल कर्नाटकच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला. हे पिस्तूल पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे, तर त्याचा वापर अन्य दोन हत्यांमध्ये कसा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
समीरच्या चौकशीत तावडेचे नाव : वीरेंद्रसिंग तावडेच्या विरोधात भक्कम पुरावे आमच्याजवळ आहेत. पानसरे दाम्पत्यावर गोळी झाडणारे दोघे कोण, पिस्तुल व मोटारसायकल या महत्त्वाच्या तिन्ही गोष्टींचा उलगडा तावडेच्या चौकशीतून होऊ शकतो. रूद्रगौडा पाटील, सारंग आकोलकर, विनय पवार, प्रवीण लिमकर, जे. पी. ऊर्फ जयप्रकाश आण्णा (कर्नाटक) असा आमचा महाराष्ट्र, कर्नाटक-गोवा ग्रुप असल्याचे समीर गायकवाडने सांगितले होते.
आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आशीष खेतान यांनी या तिन्ही हत्यांमध्ये काही पोलिसांचा सहभाग असल्याचे टिष्ट्वट केले आहे. तसेच त्यांची नावे त्यांनी दिली असून त्यांना लवकरच अटक होणार असल्याचेही म्हटले आहे.