मुलाच्या विरहातून केली पोलिसाच्या मुलीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 02:11 AM2017-03-04T02:11:39+5:302017-03-04T02:11:39+5:30
दोन महिन्यांपूर्वी इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून खाली फेकलेल्या पाच वर्षांच्या मानवी इंगळेच्या हत्येमागचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले
मुंबई : दोन महिन्यांपूर्वी इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून खाली फेकलेल्या पाच वर्षांच्या मानवी इंगळेच्या हत्येमागचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. भायखळा पोलिसांनी हत्येप्रकरणी शेजारी राहणाऱ्या रेखा विश्वनाथ सुतार या महिलेला तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. वर्षभरापूर्वी खेळता खेळता १० वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाला. मुलाच्या निधनाच्या मानसिक धक्क्यातूनच रेखाने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
घोडपदेव परिसरातील विघ्नहर्ता इमारतीच्या १५व्या मजल्यावर अशोक इंगळे हे त्यांच्या कुटुंबीयांसह भाड्याने राहतात. अशोक यांचा आॅटोमोबाइलचा व्यवसाय आहे, तर पत्नी आरती इंगळे या वरळी वाहतूक मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. १९ डिसेंबर रोजी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर निघून गेल्या. घरात पती होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या मानवीला कोणी तरी १५ व्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याने खळबळ उडाली. तिला तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. इंगळे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून भायखळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला.
तपासात सुरुवातीपासूनच इंगळेंच्या शेजारी राहत असलेल्या रेखावर संशयाची सुई होती. रेखा गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी राहते. घटनेच्या दिवशी तिचे इंगळे कुटुंबीयांसोबत भांडणही झाले होते. मात्र तिच्याविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने पोलिसांचा तपास सुरू होता. अशात फॉरेन्सिक तपासणी अहवालाच्या मदतीने यामागे रेखाच असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे पोलिसांनी शुक्रवारी रेखाला मानवीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.
वर्षभरापूर्वी घराबाहेर खेळत असताना रेखाच्या १० वर्षांच्या मुलाचा अपघाती मत्यू झाला. या घटनेमुळे रेखाचे मानसिक संतुलन ढासळले होते. त्यातूनच तिने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिंगटे यांनी दिली. शनिवारी रेखाला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर तिच्याकडे अधिक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती भायखळा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)