नवी मुंबईत पोलिसांना मारहाण
By Admin | Published: March 8, 2017 05:48 AM2017-03-08T05:48:59+5:302017-03-08T05:48:59+5:30
बांगलादेशींवर कारवाईसाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाला गावातील लोकांनी जबर मारहाण केल्याने चार पोलीस व त्यांच्या अटकेतील पाच बांगलादेशी
नवी मुंबई : बांगलादेशींवर कारवाईसाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाला गावातील लोकांनी जबर मारहाण केल्याने चार पोलीस व त्यांच्या अटकेतील पाच बांगलादेशी जखमी झाले आहेत. एनआरआय पोलीस ठाणे हद्दीतील कोंबडभुजे गावात मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही बांगलादेशी बेकायदा मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मानखुर्दमध्ये सापळा रचला होता. त्याठिकाणी काही बांगलादेशींना अटक केल्यानंतर त्यांचे इतर नातेवाईक नवी मुंबईत कोंबडभुजे गावात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली. यानुसार सात जणांचे पथक अटकेतील पाच बांगलादेशींना सोबत घेऊन पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कोंबडभुजे गावात गेले. या वेळी पोलिसांची चाहूल लागताच तिथल्या बांगलादेशीने व्यक्तीने स्वत:ला घरात कोंडून छताची कौले काढून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला. ‘गावातून कोणालाच बाहेर घेऊन जाऊ देणार नाही’ असा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोयंडे यांनी आपण पोलीस असल्याचे सांगत स्वत:चे व सहकाऱ्यांचे ओळखपत्र दाखवले. यानंतरही दीडशे ते दोनशे ग्रामस्थांच्या जमावाने पोलिसांना दोरीने बांधून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकाराची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बगाडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोयंडे, हवालदार मुरलीधर गवळी, नरेंद्र पाटील, महिला पोलीस नाईक मंगल उरणकर अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. तर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मारहाण करून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी १२५ पुरुष व ३० महिला अशा सुमारे दीडशे जणांच्या जमावावर गुन्हा दाखल केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)