पोलिस कार्यालयीन लिपिकांचे गुरुवारी राज्यभर लक्षवेध आंदोलन, नेमक्या मागण्या काय.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:56 IST2025-02-25T12:55:33+5:302025-02-25T12:56:23+5:30
काळे कपडे परिधान करून कामकाज करणार

संग्रहित छाया
कोल्हापूर : पोलिस कार्यालयीन लिपिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने देऊनही यावर पोलिस महासंचालक कार्यालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे गुरुवारी (दि.२७) राज्यभर लक्षवेध आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनादरम्यान सर्व लिपिक काळे रंगाचे कपडे परिधान करून कार्यालयीन कामकाज करणार आहेत.
कर्मचारी भरती वेळेत होत नसल्याने पोलिस महासंचालक कार्यालयापासून ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि आयुक्तालयापर्यंत सर्वत्र लिपिकांवर कामाचा ताण वाढला आहे. दर्जेदार आणि गतिमान कामकाजासाठी कामाच्या स्वरुपानुसार कर्मचारी संख्येचा आकृतिबंध तयार करावा आदींसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य गृह विभाग कार्यालयीन कर्मचारी संघटनेकडून प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या वर्षभरात संघटनेने लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देऊन मागण्या केल्या. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनाही नुकतेच निवेदन देण्यात आले. मात्र, यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर याकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने एक दिवस काळे कपडे परिधान करून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
..अन्यथा तीव्र आंदोलन
निवेदन दिल्यानंतर काळे कपडे परिधान करून आंदोलन केले जाणार आहे. पोलिस महासंचालकांनी याची दखल घेऊन तातडीने पुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
- कर्मचारी आकृतिबंध नव्याने तयार करा
- लिपिक संवर्गातील नोकर भरती करा
- जिल्हा लिपिक संवर्गातील पदोन्नती मार्गी लावा
- रखडलेल्या पदोन्नतींबद्दल निर्णय घ्या
- पदोन्नतींध्ये सर्व संवर्गातील लिपिकांना समान न्याय मिळावा