आमदार बंब यांनी दमबाजी केलेल्या पोलीस उपनिरीक्षकला लाच घेताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 01:45 PM2019-07-04T13:45:56+5:302019-07-04T13:57:46+5:30
आमदार प्रशांत बंब यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला होता.
मुंबई - गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून संतापलेल्या गंगापूर येथील भाजप आमदार प्रशांत बंब यांनी पोलीस उपनिरीक्षकला दमबाजी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. विशेष म्हणजे याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी याच अधिकाऱ्यावर ३० हजार रुपयांची लाच खाजगी व्यक्तीमार्फत स्वीकारल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
आमदार प्रशांत बंब यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला होता. ज्यात, कार्यकर्त्याची गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून संतापलेले प्रशांत बंब यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली असल्याची चर्चा होती. त्यानंतर या प्रकरणावरून माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रशांत बंब म्हणाले होते की, हा पोलीस अधिकारी गाड्या पकडतो. मग पैसे घेऊन सोडून देतो, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे त्या पोलीस उपनिरीक्षकावर रागावलो होतो.
बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये याच अधिकाऱ्याला, एका व्यक्तीवर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच पंटरमार्फत स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. गजेंद्र इंगळे यांनी समीर पठाण या व्यक्तीकडे पैसे देण्याचे फिर्यादीस सांगितेले होते. इंगळेयांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मात्र पुन्हा बंब याच्या दमबाजीच्या व्हिडिओची चर्चा जिल्हात आणि पोलीस विभागता पुन्हा पाहायला मिळत आहे.