पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयातच घेतले विष
By Admin | Published: July 15, 2016 08:35 PM2016-07-15T20:35:26+5:302016-07-15T20:35:26+5:30
पोलीस मुख्यालयात विषारी द्रव पिलेल्या एका ४३ वर्षीय पोलीस हवालदाराचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 15 - पोलीस मुख्यालयात विषारी द्रव पिलेल्या एका ४३ वर्षीय पोलीस हवालदाराचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सकाळी समोर आली असून, या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ हवालदाराच्या आत्महत्येने पोलीस दलात मात्र, एकच खळबळ उडाली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले हवालदार चंद्रप्रकाश गंगाराम कलवले (वय-४३ ऱा़लातूर ) हे शुक्रवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील राखीव दलाच्या कार्यालयानजीक अस्वस्थ अवस्थेत पडल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोनि डी़एम़शेख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवून चंद्रप्रकाश कलवले यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून औषधोपचार सुरू केले़ मात्र, कलवले यांच्या शरिरात विष पसरल्याने उपचारादरम्यान काही तासातच त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे हे करीत आहेत़
दरम्यान, हवालदार चंद्रप्रकाश कलवले यांना ८ जुलै रोजी पंढरपूर यात्रा बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. कलवले हे पंढरपूर येथे हजर न होता गैरहजर राहिले होते़ त्यानंतर ते गुरूवारी पोलीस मुख्यालयात आले असता, तेथील अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना भेटून हजर व्हावे, असे सांगितल्याचे समजते़ कलवले यांनी नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या कली ? हे समजू शकले नाही़ तर मयताचा भाऊ विकास कलवले यांनी चंद्रप्रकाश कलवले हे रात्रीपासून मुख्यालयाच्या आवारात अस्वस्थ पडलले असतानाही कोणालाच कसे दिसले नाहीत ? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी केली़
चौकशी सुरू आहे
याबाबत अपर पोलीस अधीक्षक डॉ़. दिपाली घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, हवालदार चंद्रप्रकाश कलवले यांना ८ जुलै रोजी पंढरपूर बंदोबस्तासाठी नियुक्त केले होते़ मात्र, ते तेथे हजर न होता गैरहजर राहिले होते़ रात्री हजेरी झाल्यानंतर ११ वाजेपर्यंत कर्मचारी मुख्यालयाच्या आवारात असतात़ मात्र, कलवले हे मुख्यालयात आल्याचे कोणालाही दिसले नाहीत़ सकाळीच ते बेशुध्द अवस्थेत पडल्याचे दिसून आले. या प्रकरणाची वरिष्ठस्तरावर चौकशी सुरू आहे़ तसेच आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ कलवले यांनी नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़