जीटीपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘नो’ बदल्या!

By admin | Published: February 16, 2017 05:10 AM2017-02-16T05:10:19+5:302017-02-16T05:10:19+5:30

पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरघटक सार्वत्रिक बदल्या (जीटी) होण्यापूर्वी विविध पोलीस घटकप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या

Police officers 'no' transfers before! | जीटीपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘नो’ बदल्या!

जीटीपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘नो’ बदल्या!

Next

जमीर काझी / मुंबई
पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरघटक सार्वत्रिक बदल्या (जीटी) होण्यापूर्वी विविध पोलीस घटकप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी आयुक्त, अधीक्षकांना बजावलेले आहेत. येत्या मे महिन्यांत पोलीस मुख्यालयातून बदल्यांचे आदेश जारी झाल्यानंतर, जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्याची सूचना केली आहे.
महासंचालक कार्यालयातील बदलीच्या आदेशाविरुद्ध तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर, ‘मॅट’मध्ये धाव घेऊन रद्द करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढत आहेत. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच घटकातील सेवा कालावधीच्या नियमाच्या आधारावर, एकाच आयुक्तालय/परिक्षेत्र व जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षे चिकटून राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची ‘पळवाट’आणि त्यांना ‘मॅट’मधून दिलासा मिळवून देणाऱ्या वकिलांची अडचण होणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली अधिनियम २०१५च्या कायद्यांतर्गत कलम २२ (न) मधील पोटनियमांतर्गत उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक व निरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्याचा सामान्य पदावधी हा एका पोलीस ठाणे/ शाखेत दोन वर्षे, तर जिल्ह्यामध्ये चार वर्षांसाठी आणि परिक्षेत्रात आठ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. तर मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत आठ, तर अन्य पोलीस आयुक्तालयांसाठी ६, तर एसीबी, एटीएस, सीआयडी गुप्तवार्ता, प्रशिक्षण आणि अन्य विशेष शाखा/ घटकांसाठी ३ वर्षे इतका आहे. त्यानुसार, सर्वसाधारणपणे दरवर्षाच्या ३१ मे पर्यंत संबंधित घटकांत होणाऱ्या सेवेचा कालावधी गृहित धरून, पोलीस मुख्यालयातून त्यांच्या मे/जून महिन्यांत बदल्या केल्या जातात. मात्र, काही अधिकारी संबंधित जिल्हा, आयुक्तालय किंवा विशेष शाखेतील सेवेचा कालावधी संपल्यानंतरही तेथून अन्य ठिकाणी जाण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे महासंचालकांकडून सार्वत्रिक बदल्या जारी होण्यापूर्वी, सध्या कार्यरत पोलीस ठाणे/शाखेतून त्याच जिल्हा/घटकांमधील अन्य पोलीस ठाणे किंवा शाखेत बदली करून घेतात. जेणेकरून, महासंचालकांकडून संबंधित जिल्हा व परिक्षेत्रातील कालावधी संपल्याने, त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी बदली झाल्यास त्याविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (मॅट) मध्ये धाव घेतात. सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेला नसल्याने, बदली आदेशाच्या नियमाचा भंग करण्यात आला आहे, असा आक्षेप घेत, बदली रद्द करून घेतली जात असे. याबाबत ‘मॅट’कडून मिळणाऱ्या फटकाऱ्यामुळे खात्याची प्रतिमा मलीन होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Police officers 'no' transfers before!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.