पोलीस अधिकारी सरकार पाडणार होते, या विधानाचा गृहमंत्र्यांकडून इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 07:00 AM2020-09-21T07:00:07+5:302020-09-21T07:01:15+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर टीका केली असून त्यांना जो प्रश्न विचारण्यात आला होता, त्या प्रश्नावर त्यांनी मुलाखतीतच नि:संदिग्धपणे उत्तर द्यायला हवे होते, आता खुलासे करणे योग्य नाही, असे म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न’, या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खळबळजनक मुलाखतीचे पडसाद राज्यभर उमटले. मात्र, देशमुख यांनी ‘त्या’ विधानाचा इन्कार केला असून आपल्या तोंडी ते वक्तव्य टाकले, असा खुलासा
केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर टीका केली असून त्यांना जो प्रश्न विचारण्यात आला होता, त्या प्रश्नावर त्यांनी मुलाखतीतच नि:संदिग्धपणे उत्तर द्यायला हवे होते, आता खुलासे करणे योग्य नाही, असे म्हटले आहे.
लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात घेतलेली गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलाखत ‘लोकमत’मध्ये रविवारी प्रसिद्ध होताच त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटली. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य आपण केलेले नाही. माझ्या तोंडी चुकीच्या पद्धतीने ते वक्तव्य टाकण्यात आले, असा खुलासा गृहमंत्री देशमुख यांनी पुण्यात श्रमिक पत्रकार संघात बोलताना केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी गृहमंत्री अशी विधाने करत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी असे संकेत देणे चुकीचे आहे. काही अधिकारी राजकीय विचारांची असतात असे त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय भूमिका घेणे चुकीचे आहे. जर अशी भूमिका कोणी अधिकारी घेत असतील आणि ते गृहमंत्र्यांना माहिती असेल तर त्यांनी त्यावर कारवाई करायला पाहिजे होती. मात्र त्यांनी तशा अधिकाºयांना पाठिशी घालण्याचे काम या मुलाखतीतून केले, हे देखील चुकीचे आहे, असे दरेकर म्हणाले. भाजप आमदार अतुल भातखळकर, प्रसाद लाड यांनी देखील गृहमंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडून धडे घ्यायला हवेत अशी टीका केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, काही अधिकाºयांनी जर सरकार पाडण्याचा कट रचला असेल तर हा सरकारविरोधात द्रोह आहे. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली पाहिजे. गृहमंत्र्यांनी या अधिकाºयांची नावे जाहीर करावीत. अन्यथा, आम्ही आंदोलन करू, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.
विचारलेला प्रश्न : ‘सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची एक माहिती समोर
आली होती. नेमकं काय होतं? कोण त्याच्यात सहभागी होतं? कोणाची नावं तुमच्यासमोर आली? आणि तुम्ही ते सगळं कशा पद्धतीने हॅण्डल केलं ?
दिलेले उत्तर : ‘तसं काही मला आता एकदम सांगता येणार नाही, सगळं जाहीरपणे ! पण असं काही... त्याच्यामध्ये खासकरून आता असं आहे की, आमचे पोलीस अधिकारी, सर्वच पोलीस अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात. पण, काही अलगअलग विचारांचे राहतात. त्यांचेही काही पक्षांच्या नेत्याशी जवळचे संबंध राहतात. त्यामुळे काही वक्तव्ये येत राहतात. पण, याच्या बाबतीत मी काही जाहीर वक्तव्य करू शकत नाही.’
महाराष्ट्रातल्या पोलिसांवर असे आक्षेप कधीच घेतले नव्हते. अधिकारी तेच असतात. सरकार बदलत राहते. मुलाखतीवेळी प्रश्न विचारला गेला तेव्हाच त्यांनी नि:संदिग्धपणे तो नाकारायला पाहिजे होता. त्या वेळी त्यांनी तसे केले नाही. आता मी कुटुंबप्रमुख आहे, असे म्हणणे त्याला फारसा अर्थ उरत नाही. त्यांनी जे उत्तर दिले, त्यातून तोच अर्थ ध्वनित होतो.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते