मोक्क्याखाली अटकेत कैद्यांसोबत पोलिसांची ओली पार्टी
By admin | Published: June 16, 2016 10:25 PM2016-06-16T22:25:52+5:302016-06-16T22:25:52+5:30
सात अट्टल कैद्यांसोबत दोघा पोलिसांनी ओली पार्टी झोडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 16 - सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सात अट्टल कैद्यांसोबत दोघा पोलिसांनी ओली पार्टी झोडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी रुग्णालयात छापा टाकल्यानंतर टेरेसवरुन उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्न करताना तिघे कैदी जखमी झाले. याप्रकरणी मोकाखाली अटकेत असलेल्या सोमप्रशांत पाटील याला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोन पोलिसांसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार बाबूराव ज्योतीराम चौगुले, आणि पोलिस कॉन्स्टेबल मारुती भाऊसाो पाटील (बक्कल नंबर १०१८) अशी अटक झालेल्या पोलिसांची नावे आहेत. याशिवाय मोकाखाली कैदेत असलेला सोमप्रशांत पाटील याच्यासह दिग्विजय शिवाजीराव पोवार (३७ रा. सनसिटी न्यू पॅलेस, कोल्हापूर) यालाही अटक झाली आहे.
कैदी वॉर्डच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून पळून जाताना जखमी झालेले संशयित आरोपी संजय दिनेशराव कदम ,जगदिश प्रभाकर बाबर, अभिजित शरद चव्हाण (सर्व रा. कोल्हापूर) या तिघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुण्यातील गजा मारणे टोळीतील सोमप्रशांत पाटील हा सीपीआर येथील कैदी वॉर्डात दि. १३ मे २०१६ पासून मूत्रपिंडाच्या त्रासामुळे उपचारासाठी दाखल आहे. बुधवारी रात्री संशयित सहाय्यक फौजदार बाबूराव चौगुले, कॉन्स्टेबल मारुती पाटील हे सोमप्रशांत पाटील, दिनेश कदम, जगदिश बाबर, अभिजित चव्हाण, दिग्विजय पोवार हे कैदी असे सातजण कैदी वॉर्डच्या इमारतीच्या टेरेसवर मद्यप्राशन करून जेवायला बसले होते. हा प्रकार समजताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला.
पोलिस आल्याचे पाहताच त्यांची एकच धांदल उडाली. त्यावेळी संजय कदम, जगदिश बाबर व अभिजित चव्हाण या तिघांना इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. त्यामध्ये बाबर व अभिजित चव्हाण या दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले तर दिनेश कदमचा हात मोडला व ते जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यात वापरलेली कार, एक दुचाकी, ५३ हजार रुपये, किमती विदेशी दारू, रिकाम्या बाटल्या असा सुमारे नऊ लाख ८९ हजार ६७० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.