पोलिसांची दहशत चार दिवसांनंतरही कायम!
By Admin | Published: April 25, 2015 02:14 AM2015-04-25T02:14:28+5:302015-04-25T02:14:28+5:30
कापशी हैदोस प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी.
सचिन राऊत /अकोला : रस्ते चकाचक; मात्र दुचाकींसह इतर वाहने भंगारावस्थेत पडलेली.. इमारती आलिशान; मात्र महागडे गेटलाईट, टीव्ही आणि खिडक्यांच्या काचा फोडलेल्या.. लहान-मोठय़ा घराचे दरवाजे तोडलेले अन् कुलर पडलेले.. बहुतांश वारकरी सांप्रदायाचे, त्यामुळे गावात भांडण तंटा नाहीच.. मात्र पोलिसांनी मंगळवारी रात्रभर घातलेल्या हैदोसाने सधन कापशीचा चेहरा विद्रुप झाला. घटना होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला तरी पोलिसी क्रौर्याच्या खूणा आजही गावात दिसून येतात. गावात जुगारावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. याच कारणावरुन जवळपास १५0 पोलिसांनी गावात प्रत्येकाच्या घरात घुसून प्रचंड तोडफोड, नासधूस केली. जुगार खेळणारे कापशीतीलच ग्रामस्थ आहेत किंवा नाही, याची शहानिशा न करता पोलिसांनी महिला, वृध्द, गर्भवती, चिमुकल्यांसह कुणालाही न सोडता अत्याचाराची परिसीमा गाठली. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे, पोलिस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी गुरुवारी गावची पाहणी केली असता, गावचे चित्र पाहून त्यांची मनेही हेलावली. झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी ग्रामस्थांसमोर जाहीर माफी मागितली. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले; मात्र लहान मुलं, महिलांमध्ये पोलिसांची दहशत चार दिवसानंतरही कायम होती. पोलिसांनी गावातील १00 वर वाहनांची तोडफोड केली, घराचे दरवाजे मोडले, भिंती पाडल्या, खिडक्यांचा काचा फोडल्या, कुलर मोडले, टीव्ही फोडल्या, बहुतांश घरांतील साहित्याची नासधूस केली. या कृत्याने पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. गुंडांनाही लाजविणारा ह्यखाकीह्णचा अत्याचार बिहारमध्ये घडणार्या घटनांपेक्षाही गंभीर असल्याचे खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षकांनी कबुल केले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. पोलिसांनी गावात हैदोस घालून केलेली नासधूस ही त्यांनी केलेल्या कृत्याची साक्ष देणारी आहे. त्यामुळे संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत पोलिसी क्रौर्याच्या खूणा अशाच ठेवल्या जातील, असा इशारा कापशीवासीयांनी दिला आहे.