पोलीस कर्मचारी, कैद्यांच्या प्रवास भाड्याची २० लाखांची रक्कम एसटी महामंडळाला अदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 07:20 PM2017-11-11T19:20:46+5:302017-11-11T19:21:13+5:30
अमरावती - राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) यांच्या अहवालानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून पोलीस कर्मचारी व कैद्यांची प्रवास करण्याच्या सन २०१५ ते २०१७ या कालावधीतील भाड्याचे व्याजासह झालेल्या २ कोटी २१ लाख ४५ हजार ७०० रुपयांपैकी १९ लाख ९७ हजारांची रक्कम अदा करण्याचा निर्णय शुक्रवारी गृहविभागाने घेतला.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून कर्तव्यार्थ प्रवास करणारे पोलीस कर्मचारी व कैदी यांच्या प्रवासी खर्चाची रक्कम कारागृह विभागाकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळास अदा करण्यात येते. दोन वर्षांतील थकबाकी व्याजासह दोन कोटींवर गेली आहे. ही रक्कम कारागृह विभागाने राज्य मार्ग परिवहन महामंडळास अद्याप देय असल्याचे अपर पोलीस महासंचालकांनी कळविले होते. त्यासाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या २५ लाखांपैकी ७० टक्के निधी १९ लाख ९७ हजार रुपये अदा करण्याचा निर्णय शुक्रवारी झाला.
सदर खर्च ‘तुरुंग योजनेतर योजना, संचालक व प्रशासन, कारागृह महानिरीक्षणालय व इतर खर्च दत्तमत’ या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व सन २०१७-१८ या वित्तीय वर्षाकरिता मंजूर झालेल्या अनुदानातून भागविण्यात यावा. सदर रक्कम फक्त प्रवास भाड्यापोटी अदा करावयाची असून, त्यात थकीत रक्कमेवरील व्याजाचा समावेश असणार नाही. थकीत रकमेवरील व्याजाबाबत यथावकाश शासनस्तरावरून निर्णय घेणार असल्याचे सहसचिव ज.ल. पावरा यांनी स्पष्ट केले आहे.