दरोड्यातील आरोपींना पोलिसांचे संरक्षण
By Admin | Published: July 22, 2016 03:14 AM2016-07-22T03:14:30+5:302016-07-22T03:14:30+5:30
ज्येष्ठ नागरिक नऊ वर्षांपासून त्यांची अंधेरी येथील चकाला परिसरातील जमीन बळकावल्याप्रकरणी एकाकी लढा देत आहेत.
मुंबई : कन्हैया मोटवानी हे ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक नऊ वर्षांपासून त्यांची अंधेरी येथील चकाला परिसरातील जमीन बळकावल्याप्रकरणी एकाकी लढा देत आहेत. जमीन बळकावल्यानंतर आपले कार्यालय फोडून ताब्यात घेणाऱ्या आरोपींविरुद्ध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निर्देश देऊनही संबंधित एमआयडीसी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यास तब्बल चार वर्षे टाळाटाळ केल्याचे सांगत आपल्याला आलेला हा अनुभव शासन व्यवस्थेवरील विश्वास उडविणारा असल्याचे मोटवानी नमूद करतात.
कन्हैया मोटवानी यांनी खरेदीपत्रे व विकास करारनामा करून चकाला येथील अरजनदास ठाकूर कुटुबीयांची सुमारे आठ एकर अविभक्त जमीन १९९४मध्ये संपादित करून येथे पुनर्विकासाचे काम सुरू केले. या भूखंडावरील बंगला विकत घेऊन तेथे आपले कार्यालय थाटले होते. ‘ठाकूर कुटुंबीय व एचडीआयएलच्या संचालकांनी आपापसात संगनमत करून या जमिनीची पुन्हा खरेदीपत्रे तयार केली व माझी जमीन बळकावली. त्यानंतर तेथे झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजनेअंतर्गत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील झोपड्यांचे पुनर्वसन करण्याची योजना आखली. झो.पु. प्राधिकरणाने १९ नोव्हेंबर २0१0 रोजी मंजुरी ( लेटर आॅफ इंटेन्ट ) दिले. या जागेवरील माझ्या बंगल्याचा कब्जा घेतल्याशिवाय प्रकल्प सुरू होणार नाही, हे ओळखून २१ फेब्रुवारी २0१0 रोजी स्वत: एचडीआयएलचे प्रमुख राकेश वाधवान व त्यांच्या २00 ते २५0 साथीदारांनी पोकलेन मिशनच्या साहाय्याने बंगला पाडण्याचा व कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परंतु पोलिसांनी राकेश वाधवान यांची साधी औपचारिक चौकशीही केली नाही. या गुन्ह्याशी संबंध नसलेल्या दोन निरपराध लोकांविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करून एमआयडीसी पोलिसांनी खऱ्या आरोपींचा बचाव केला. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली असता आॅगस्ट २0१३मध्ये वेगळ्या पोलीस ठाण्यामार्फत फेरतपास करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याचे मोटवानी यांनी सांगितले.
अप्पर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करून दोषारोपपत्र एक महिन्यात सादर करण्याचे लेखी आदेश २५ नोव्हेंबर २0१४ रोजी देऊनही एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. ज्या दिवशी बंगला पाडून कब्जा करण्याचा प्रयत्न झाला त्याच दिवशी संध्याकाळी जवळच्या झोपडपट्टीवर राकेश वाधवान याच्या साथीदारांनी मोजणी करण्यास विरोध केल्याने मोठी दंगल करून अनेकांना बेदम मारहाण करून वाहनांची मोडतोड केल्याचा गुन्हा दाखल असून, त्यात गुंड शेखर गौडा व त्याच्या अनेक साथीदारांना अटक झाली होती. आपल्या बंगल्यात घुसून मोडतोड करणारे व वरील दंगलीमधील आरोपी एकच आहेत हे सांगून एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही, असा मोटवानी यांचा आरोप आहे.
२१ फेब्रुवारी २0११ रोजी बंगल्याचा ताबा घेता न आल्याने राकेश वाधवान यांनी २८ फेब्रुवारी २0११ बंगला पाडण्याचे काम काशी-पाशी गुन्हेगार टोळीचा प्रमुख काशिनाथ पाशी याचा भाऊ सुभाष पाशी व गुंड शेखर गौडा यांच्या टोळीला दिले. त्यांनी सुरक्षारक्षकांना मारहाण करून बंगल्यातील लाखो रुपयांच्या सामानाची लूट करून जागेचा कब्जा घेतला. मी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून तक्रार केली होती. पोलीस व्हॅन जागेवर आली होती; पण त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले नाही किंवा पंचनामाही केला नाही.
पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यास कित्येक तास थांबले. पण तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक हुजबंद यांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला व केवळ ठाणे दैनंदिनीत नोंद केली, अशी माहिती मोटवानी यांनी दिली.
वारंवार पाठपुरावा करूनही गुन्हा नोंद न केल्याने मी तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व मिलिंद भारांबे यांची भेट घेतली असता त्यांनी संबंधित उपआयुक्तांना मोटवानी यांच्या तक्रारीची चौकशी करून २८ फेब्रुवारी २0११च्या घटनेबद्दल तत्काळ गुन्हा नोंद करण्याचे लेखी आदेश दिले होते.
इतक्या दिरंगाईनंतर २१ मे २0१५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे राकेश वाधवान, सुभाष पाशी, शेखर गौडा व त्यांच्या साथीदारांविरुद्ध दरोड्यासह अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. परंतु एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतरही एकाही आरोपीला अटक झाली नाही. किंवा लुटीतील मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली नाही, असा आरोप मोटवानी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
।आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न
‘मी अनेकदा विद्यमान अप्पर पोलीस आयुक्त छेरिंग दोरजे तसेच सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन दाद मागितली. मात्र आरोपी इतके प्रभावी आहेत की पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत अद्याप पोहचू शकले नाहीत. आपल्या हयातीत गुन्हेगारांवर कारवाई होण्याची मी वाट पाहात आहे,’ असे मोटवानी सांगतात.