सनातन आश्रमाला पोलीस संरक्षण

By Admin | Published: June 13, 2016 04:53 AM2016-06-13T04:53:32+5:302016-06-13T04:53:32+5:30

श्रमिक मुक्ती दल संघटनेने रामनाथी-फोंडा येथील सनातनच्या आश्रमात घुसून दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा इशारा दिला

Police protection of Sanatan ashram | सनातन आश्रमाला पोलीस संरक्षण

सनातन आश्रमाला पोलीस संरक्षण

googlenewsNext


फोंडा (गोवा) : श्रमिक मुक्ती दल संघटनेने रामनाथी-फोंडा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात घुसून, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आश्रमाजवळ रविवारी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी
यांच्या हत्यांसंदर्भात सनातन संस्था सध्या संशयाच्या घेऱ्यात आहे. सनातनच्या साधकांवर अटकेची कारवाई सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या इशाऱ्यानंतर सनातन संस्थेतर्फे पोलिसांकडे संरक्षण मागणारे निवेदन दिले होते. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांना गोव्यात प्रवेशबंदी लागू करण्याची मागणीही सनातनने केली आहे. (प्रतिनिधी)
तिन्ही हत्या प्रकरणांचे सूत्रधार सनातनमध्येच असल्याचे आमचे मत ठामच आहे. पोलीस मूळ सूत्रधारापर्यंत लवकरच पोहोचतील, अशी अपेक्षा करू या. त्यामुळे तूर्त ५ सप्टेंबरपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित केले आहे.
- कॉ. संपत देसाई, राज्य निमंत्रक, श्रमिक मुक्ती दल, महाराष्ट्र
>मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट
करावी - पृथ्वीराज चव्हाण
इंदापूर : सनातन संस्थेवरील बंदीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत तत्कालीन आघाडी सरकारने केंद्र शासनाकडे केलेला अर्ज प्रलंबित आहे. बंदी घालण्याची आग्रही मागणी आपण त्या वेळी केली होती. सध्याच्या सरकारने बंदीबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले.
सनातनवर तातडीने
बंदी घाला -सपा
मुंबई : सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांवर अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप असल्यामुळे केंद्र सरकारने या संघटनेवर तातडीने बंदी घालावी अन्यथा त्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी दिला आहे.
‘सनातन’च्या वकिलाच्या
चौकशीची मागणी
सांगली : गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटातील फरार संशयित आरोपी सारंग अकोलकर हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडे याच्या संपर्कात असल्याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. ‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर हेही ‘अकोलकर हा माझ्या संपर्कात आहे’, असे जाहीरपणे सांगत असतील, तर याप्रकरणी अ‍ॅड. पुनाळेकर यांची चौकशी करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी केली.
वीरेंद्र तावडेचे सहा जणांशी कनेक्शन
कोल्हापूर : मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रूद्रगौडा पाटील, ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड, प्रवीण लिमकर यांच्याशी डॉ. वीरेंद्र तावडे याचा फोनवरून अनेक वेळा संवाद झाला आहे. तावडेच्या मोबाइल कॉल डिटेल्सवरून ही माहिती पुढे आल्याचे ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पनवेल येथील आश्रमातही त्यांच्या अनेक वेळा भेटीगाठी झाल्याचे समजते. सहा जणांचे रॅकेट असून, त्यांनी या तिन्ही हत्या कट रचून घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.

Web Title: Police protection of Sanatan ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.