‘एल्गार’वर पोलिसांचे धाडसत्र, कार्यकर्त्यांच्या घरांवर छापेमारी, कारवाईचा तीव्र निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 06:06 AM2018-04-18T06:06:05+5:302018-04-18T06:06:05+5:30
नक्षली कारवायांमध्ये गुंतल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी मंगळवारी कबीर कला मंचच्या पुणे, दिल्ली, मुंबई व नागपूर येथे कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे घातले़ त्यात पुण्यातील तीन, मुंबईतील दोन आणि नागपूरमधील एका वकिलांच्या घराचा समावेश आहे.
मुंबई/पुणे/नागपूर: नक्षली कारवायांमध्ये गुंतल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी मंगळवारी कबीर कला मंचच्या पुणे, दिल्ली, मुंबई व नागपूर येथे कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे घातले़ त्यात पुण्यातील तीन, मुंबईतील दोन आणि नागपूरमधील एका वकिलांच्या घराचा समावेश आहे़ मुंबईतील रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयातही झडती घेण्यात आली आहे़
पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळे १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा इथे हिंसाचार उफाळला, असा आरोप परिषदेच्या आयोजकांवर असून या प्रकरणी कबीर कला मंचच्या चार जणांसह एकूण आठ जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी मंगळवारी पहाटेपासून एकाचवेळी पुणे, मुंबई आणि नागपूर येथे न्यायालयाचे सर्च वॉरंट घेऊन छापेमारी केली़
पुण्यातील येरवडा भागातील रमेश गायचोर व ज्योती जगताप, वाकड येथील सागर गोरखे आणि पिंपळे गुरव येथील दीपक डेंगळे यांच्या घरी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलीस पोहचले़ हे कार्यकर्ते काल रात्रीच घरी आले होते़ सकाळी ते कोल्हापूरला जाण्याच्या तयारीत होते़ कारवाईत कबीर कला मंचचे पथनाट्याचे स्क्रीप्ट, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, काही पुस्तके, माहिती पत्रके जप्त करण्यात आली आहेत. शाहीर सागर यांनी एल्गार परिषदेत गायलेल्या गाण्यावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे. स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या विशेष तपास पथकाने ही सर्च कारवाई करीत वेणूनगर, वाकड येथील सागर यांच्या घरावर छापा मारत त्याच्याकडील पुस्तके, सीडी, मोबाईल, पेन ड्राइव्ह व अन्य काही वस्तू जप्त केल्या.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईबद्दल भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला.
मुंबईतही झाडाझडती
मुंबईत रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे आणि एल्गार परिषदेच्या आयोजक हर्षाली पोतदार यांच्या घरी व कार्यालयांची झडती घेण्यात आली तसेच नागपूरमधील अॅड़ सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी तपासणी करण्यात आली. तर दिल्लीत प्रा़ साईबाबांच्या निकटवर्तीच्या घरी झडती
नागपुरात वकिलाच्या घरावर छापा
गेल्या २० वर्षांपासून नक्षलवाद्यांशी संबंधित केसेस लढविणारे नागपूर येथील अॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी पोलिसांनी मंगळवारी पहाटे छापा घातला. नागपूर-विदर्भातील फ्रंटल आॅर्गनायझेशनवर नक्षलविरोधी अभियान तसेच स्थानिक पोलीस अनेक वर्षांपासून नजर ठेवून आहे. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेसाठी जमविण्यात आलेल्या निधीपैकी काही निधी नागपुरातून गेल्याचा संशय आहे.
़़़़़़़़
नक्षली हालचालींशी संबंधित असलेल्या लोकांवर केंद्रीय विशेष पथकाकडून देशभर ही कारवाई होत आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आरएसएस आणि तशी विचारधारा बाळगणारांचे हस्तक बनून पोलीस काम करीत आहेत. मात्र, कोरेगाव भीमाच्या दंगलीचे सूत्रधार संभाजी भिडे यांना सरकार अटक करत नाही.
- अॅड.सुरेंद्र गडलिंग, नागपूर